कुणी फेकले टमरेल तर कुणी ठोकली धूम

By Admin | Updated: February 22, 2017 00:30 IST2017-02-22T00:30:43+5:302017-02-22T00:30:43+5:30

शौचालय नसल्याने उघड्यावर जाणाऱ्यांसोबतच घरी शौचालय असल्यानंतरही उघड्यावर जाणाऱ्यांची संख्या कमी नाही. मात्र उघड्यावर शौचास जाणाऱ्यांची कशी फजिती होते, ...

Who woke up if someone threw a smile | कुणी फेकले टमरेल तर कुणी ठोकली धूम

कुणी फेकले टमरेल तर कुणी ठोकली धूम

उघड्यावर शौचास बसणाऱ्यांची शेतशिवारात पळापळ : तुमसर तालुक्यातील येरली येथे ग्रामस्थांची तारांबळ
भंडारा : शौचालय नसल्याने उघड्यावर जाणाऱ्यांसोबतच घरी शौचालय असल्यानंतरही उघड्यावर जाणाऱ्यांची संख्या कमी नाही. मात्र उघड्यावर शौचास जाणाऱ्यांची कशी फजिती होते, ती तुमसर तालुक्यातील येरली येथील ग्रामस्थांना विचारल्यास ते शब्दात सांगू शकणारे नाही. ‘गुडमॉर्निंग पथक’ाच्या कारवाईच्या धास्तीने मंगळवारला येरलीतील उघड्यावर जाणाऱ्यांची तारांबळ उडाली. कारवाईच्या भीतीने कुणी पाणी भरलेले टमरेल फेकले तर काहींनी आहे त्या परिस्थितीत शेतशिवारातून घराकडे धूम ठोकली.
जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाच्या गुडमॉर्निंग पथकाने मंगळवारला येरली गावात बस्तान मांडले. त्यांच्यासोबत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना बघून येरलीवासीयांची चांगलीच तारांबळ उडाली. एखाद्या चित्रपटातील प्रसंगाला शोभावा असाच कल्पना न केलेला प्रसंग प्रत्यक्षात भल्या पहाटेपासूनच येरलीत घडला. मागील काही दिवसांपासून स्वच्छता मिशन पथकाने ‘ओडीएफ’ अंतर्गत जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी गावस्तरावर शौचालय बांधकामावर भर दिला आहे. त्यांच्या पुढाकाराने अनेक गावे आता हागणदारीमुक्तीच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. तरीही मात्र काही गावे याला अपवाद ठरलेली आहेत.
तुमसर तालुक्यात मागील १५ दिवसांपासून या पथकाने भल्या पहाटेच गाव गाठून गावाच्या वेशीवर पाळत ठेवून उघड्यावर जाणाऱ्यांना गुलाब फुल देऊन शौचालय बांधण्याचे मार्गदर्शन करीत आहेत. या पथकाच्या मार्गदर्शन व कारवाईच्या धास्तीने अनेकांनी शौचालयाचे बांधकाम सुरू केले असून काहींचे बांधकाम पूर्ण झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे. गुडमॉर्निंग पथकाच्या पुढकाराने गाव विकासाच्या वाटेत एक पाऊल पुढे जात असल्याचे हे आदर्श उदाहरण म्हणावे लागेल.
येरली येथे गुडमॉर्निंग पथकाने पहाटेच धडक दिली. यावेळी त्यांनी दोन पथक गावाच्या वेगवेगळ्या दिशेने पाठविले. येथील अनेकांनी सूर्योदय होताच हातात ‘तांब्या’ घेऊन गावालगतच्या तलावांच्या दिशेने प्रात:विधी आटोपण्यासाठी मोर्चा वळविला. हे दृष्य बघताच गुडमॉर्निंग पथक त्यांच्यासमोर उभे ठाकले. या पथकाला बघून अनेकांच्या बोबड्या वळल्या. काहींनी पाणी भरलेले टमरेल फेकले तर अनेकांनी मिळेल त्या दिशेने धूम ठोकली. शेतशिवारातून मार्ग काढताना अनेकांची चांगलीच फटफजिती झाली.
हे दृष्य बघताना अनेकांना हसू आवरता आले नाही. ज्यांना पळता आले नाही ते पथकासमोर निरूत्तरीत होऊन उभे झाले. अशा ‘लोटेधाऱ्यांना’ पथकाने गुलाबाचे फुल दिले. त्यांना शौचालय बांधण्याचे मार्गदर्शन करून गावाला समृद्धीच्या दिशेने नेण्याच्या दिशेने व हागणदारीमुक्त गाव म्हणून ओळख निर्माण करण्याच्या दृष्टीने सहकार्य करण्याचे आवाहन केले. या धडक कारवाईनंतर अनेकांनी उघड्यावर शौचासाठी जाणार नसल्याचे पथकाला सांगून सुटका करवून घेतली. (शहर प्रतिनिधी)

वऱ्हाडीही अडकले ‘लोट्यात’
येरली येथे एका कुटुंबाकडे विवाहाचा कार्यक्रम असल्याने त्यांच्याकडे पाहुण्यांची रेलचेल होती. यातील अनेकांकडे शौचालय असले तरी वऱ्हाडी म्हणून ते विवाह घरी आले होते. या घरी शौचालयाची व्यवस्था अपुरी असल्याने अनेकांनी ‘लोटा’ पकडून बाहेर जाणे पसंत केले. मात्र गुडमॉर्निंग पथकाची कारवाई सुरु असल्याची कल्पना नसल्याने हे वऱ्हाडीही यात अडकले. या पथकाने मंगळवारला येरली येथील ३० ते ३५ लोटे जप्त करून ग्रामपंचायत कार्यालयासमोर टांगून ठेवले.
शौचालय बांधण्याचा अनेकांनी केला निर्धार
भविष्यात अशीच परिस्थिती प्रत्येकांवर ओढवेल त्यामुळे पथकाच्या कारवाईच्या धास्तीने अनेक गावांमध्ये आता शौचालय बांधकामाचे वातावरण निर्मिती आपसुकच होऊ लागली आहे. ज्यांच्याकडे शौचालय आहे अशांनी आता शौचालयात जाण्याचा तर ज्यांच्याकडे नाही त्यांनी शौचालय बांधण्याचा निर्धार केला आहे.

Web Title: Who woke up if someone threw a smile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.