रेती तस्करांकडून हप्ता घेणारा 'तो' कोण?
By Admin | Updated: December 11, 2015 01:12 IST2015-12-11T01:12:30+5:302015-12-11T01:12:30+5:30
मागील दोन महिन्यांपासून साकोली तालुक्यात रेतीतस्करांकडून हप्ता घेऊन रेती उत्खनन सुरु आहे.

रेती तस्करांकडून हप्ता घेणारा 'तो' कोण?
रेती उत्खननाची चौकशी करा : नेपाल रंगारी यांची मागणी
साकोली : मागील दोन महिन्यांपासून साकोली तालुक्यात रेतीतस्करांकडून हप्ता घेऊन रेती उत्खनन सुरु आहे. हा हप्ता घेणारा अधिकारी कोण? या प्रकरणाची चौकशी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करावी, अशी मागणी जोर धरत असतानाच या आठवड्यात ट्रॅक्टर पकडून २० ते २५ हजार रुपये घेऊन ट्रॅक्टर सोडल्याचीही चर्चा आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य डॉ.नेपाल रंगारी यांनी केली आहे.
रेती घाटाची मुदत संपली असल्याने सध्या साकोली तालुक्यातील अधिकाऱ्यांचे चांगलेच दिवस आले. हे अधिकारी आपल्या अधिनस्त कर्मचाऱ्यांशी संगनमत करून पूर्वी अवैध तस्करांशी संपर्क साधून चार ते पाच हजार रुपये हप्ता देण्याचे ठरवतात व ज्यांनी हप्ता देण्यास नकार दिला त्यांचे ट्रॅक्टर पकडून ते ट्रॅक्टर साकोली तहसील कार्यालय व पोलीस स्टेशन येथे आणतात व येथे आणल्यावर त्यांच्याशी मांडवली करतात व २० ते २५ हजार रुपये घेऊन ट्रॅक्टर सोडतात. नुकत्याच दोन दिवसापूर्वी एका ट्रॅक्टर मालकाने हप्ता देण्यास नकार दिल्याने ट्रॅक्टर साकोलीला आणून दाटदपट करून १९ हजार रुपये घेतल्याची चर्चा आहे. याही प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे. (तालुका प्रतिनिधी)