सभापतिपद कुणाला ?

By Admin | Updated: July 12, 2015 00:40 IST2015-07-12T00:40:47+5:302015-07-12T00:40:47+5:30

जिल्ह्यातील सात पंचायत समितींच्या सभापती व उपसभापतिपद निवडीकरिता रविवारला दुपारी २ वाजता विशेष सभा होत आहे.

Who is the chairmanship? | सभापतिपद कुणाला ?

सभापतिपद कुणाला ?

निवडणूक आज : भाजपची चार तर काँग्रेसचे तीन तालुक्यात सत्ता
भंडारा : जिल्ह्यातील सात पंचायत समितींच्या सभापती व उपसभापतिपद निवडीकरिता रविवारला दुपारी २ वाजता विशेष सभा होत आहे. भंडारा, तुमसर, साकोली व मोहाडी पंचायत समितीत भाजपला तर पवनी, लाखनी व लाखांदुरात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. आता पक्षश्रेष्ठी ठरवतील त्यांना पदाचा मान मिळणार असला तरी खुर्चीवर बसण्यासाठी उमेदवारांची नेत्याकडे फिल्डिंग सुरू आहे.
साकोली पंचायत समितीत सभापतिपद अनुसूचित जाती प्रवर्गाकरीता राखीव असून १२ जागांपैकी ८ भाजप तर ४ काँग्रेस असे बलाबल आहे. याठिकाणी सानगडी क्षेत्रातून निवडून आलेले भाजपचे धनपाल उंदीरवाडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. लाखनी पंचायत समितीत सभापतिपद अनुसूचित जमाती महिला प्रवर्गाकरीता राखीव असून १२ जागांपैकी ८ काँगे्रस, ३ भाजप आणि १ अपक्ष असे बलाबल आहे. याठिकाणी केसलवाडा क्षेत्रातून निवडून आलेले काँग्रेसच्या रजनी आत्राम यांचा सभापती होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कारण आरक्षित पदासाठी त्या एकमेव उमेदवार आहेत. लाखांदूर पंचायत समितीत सभापतिपद नागरिकांचा मागास महिला प्रवर्गाकरीता राखीव असून १२ जागांपैकी ७ काँग्रेस, ४ भाजप, १ राष्ट्रवादी असे बलाबल आहे. याठिकाणी बारव्हा क्षेत्रातून निवडून आलेले काँग्रेसच्या मंगला बगमारे यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे.
भंडारा पंचायत समितीत सभापतिपद नागरिकांचा मागास महिला प्रवर्गाकरीता राखीव असून २० जागांपैकी १० भाजप, ३ काँग्रेस, ५ राष्ट्रवादी, २ शिवसेना असे बलाबल आहे. याठिकाणी गणेशपूर क्षेत्रातून निवडून आलेले भाजपच्या वर्षा साकुरे यांच्या नावाची चर्चा आहे. पवनी पंचायत समितीत सभापतिपद सर्वसाधारण महिला प्रवर्गाकरीता राखीव असून १४ जागांपैकी ७ काँग्रेस, ३ अपक्ष, २ भाजप तर शिवसेना व राष्ट्रवादीला प्रत्येकी एक जागा मिळाली आहे. यात मांगली क्षेत्रातून विजयी झालेल्या काँग्रेसच्या अर्चना वैद्य सभापती तर राष्ट्रवादीच्या एकमेव उमेदवार खैरी येथील तोमेश्वर पंचभाई उपसभापती होण्याची चिन्हे आहेत.
तुमसर पंचायत समितीत सभापतिपद सर्वसाधारण महिला प्रवर्गाकरीता राखीव असून २० जागांपैकी ९ भाजप, ७ राष्ट्रवादी, २ शिवसेना, काँग्रेस आणि अपक्षांना प्रत्येकी एक जागा मिळाली आहे. यात येरली क्षेत्रातून विजयी झालेले भाजपच्या कविता बनकर या सभापती तर चिखला क्षेत्रातून निवडून आलेले शेखर कोतपल्लीवार हे उपसभापती होण्याची शक्यता आहे. मोहाडी पंचायत समितीत सभापतिपद सर्वसाधारण प्रवर्गाकरीता राखीव असून १४ जागांपैकी ९ भाजप, २ राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना व अपक्षांना प्रत्येकी एक जागा मिळाली आहे. याठिकाणी करडी क्षेत्रातून विजयी झालेले भाजपचे विलास गोबाडे यांच्या नावावर मोहोर लागण्याची शक्यता आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Who is the chairmanship?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.