सोंड्याटोला ठरला पांढरा हत्ती

By Admin | Updated: October 21, 2015 00:40 IST2015-10-21T00:40:01+5:302015-10-21T00:40:01+5:30

सिहोरा परिसरातील शेती सिंचनाकरिता सोंड्याटोला उपसा सिंचन योजनेमधील विघ्न टळता टळत नाही.

White elephant to become Santoli | सोंड्याटोला ठरला पांढरा हत्ती

सोंड्याटोला ठरला पांढरा हत्ती

तुमसरात नियंत्रण गोंदियातून : हस्तांतरणाचे भिजत घोंगडे प्रकल्प
मोहन भोयर तुमसर
सिहोरा परिसरातील शेती सिंचनाकरिता सोंड्याटोला उपसा सिंचन योजनेमधील विघ्न टळता टळत नाही. कायमस्वरुपी नियोजनाअभावी हा प्रकल्प पांढरा हत्ती ठरत आहे. जिथे पाणी तिथे नियोजन नाही व जिथे नियोजन केले जाते तिथे पाणी नाही अशी स्थिती आहे.
सिहोरा-बपेरा परिसरात शेती सुजलाम सुफलाम करण्याकरिता बावनथडी नदीवर सोंड्याटोला उपसा सिंचन योजना कार्यान्वित करण्यात आली, परंतु ही योजना केवळ दोन ते तीन वर्षे सुरळीत सुरु होती. शेकडो हेक्टर सिंचनाची क्षमता या योजनेत आहे. शासन व प्रशासनाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. पावसाळ्यात बावनथडी नदीतून पाण्याचा उपसा करुन चांदपूर या अतिशय मोठ्या तलावात करण्यात येते. नंतर शेतीला हे पाणी सिंचनाकरिता देण्यात येते. सुमारे १२५ कोटी रुपये खर्च करुन ही योजना पुर्ण करण्यात आली, पंरतु नियोजनाचा अभाव येथे सुरुवातीपासूनच दिसून येत आहे.
हस्तांतरण केव्हा होणार ?
पाणी वितरणाची जबाबदारी लघु पाटबंधारे विभागाचे आहे. ही योजना विदर्भ पाटबंधारे महामंडळाच्या नियंत्रणात आहे. गोंदिया जिल्हयातील तिरोडा उपसा सिंचन प्रकल्पाची देखरेख आहे. प्रकल्प तुमसर तालुक्यात असून देखरेख व नियंत्रण सध्या गोंदिया जिल्ह्यातून करणे सुरु आहे. याकडे आतापर्यंत कुणाच लोकप्रतिनिधीकडे लक्ष गेले नाही ही शोकांतिका आहे.
सध्या या प्रकल्पाचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. ३४ लाख रुपयांचे वीज बील थकीत असल्याने वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. एकीकडे तलावात पाणी आहे, पंरतु नियोजन नाही अशी परिस्थीती आहे. यासंदर्भात सोंड्याटोला उपसा सिंचन योजनेचे उपविभागीय अभियंत्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. अन्य अधिकारी बोलायला तयार नाहीत. उंटावरुन शेळ्या हाकण्याचा हा प्रकार मागील अनेक दिवसांपासून सुरु आहे. अशीच परिस्थिती राहिली तर एक दिवस हा प्रकल्प भंगारात निघाल्याशिवाय राहणार नाही. यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्याची गरज आहे.

Web Title: White elephant to become Santoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.