लाच घेताना अन्न सुरक्षा अधिकारी गजाआड
By Admin | Updated: June 16, 2014 23:19 IST2014-06-16T23:19:25+5:302014-06-16T23:19:25+5:30
शीतपेय दुकानाची तपासणी केल्यानंतर मिळालेल्या नोटिसावर कारवाई टाळण्यासाठी अन्न व सुरक्षा अधिकाऱ्याने सहा हजार रूपयांची लाच मागितली. लाच स्वीकारताना अशोक नागोराव आठवले या अन्न व सुरक्षा

लाच घेताना अन्न सुरक्षा अधिकारी गजाआड
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई : प्रकरण मिटविण्यासाठी मागितले पैसे
भंडारा : शीतपेय दुकानाची तपासणी केल्यानंतर मिळालेल्या नोटिसावर कारवाई टाळण्यासाठी अन्न व सुरक्षा अधिकाऱ्याने सहा हजार रूपयांची लाच मागितली. लाच स्वीकारताना अशोक नागोराव आठवले या अन्न व सुरक्षा अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. ही कारवाई सोमवारी भंडारा स्थित सदर कार्यालयात करण्यात आली. यामुळे परिसरात एकच हडकंप उडाला.
माहितीनुसार, रामराज शालिकराम सार्वे यांची खात रोड मार्गावर रजनीनगर स्थित यशराज इंटरप्राईजेस नावा अंतर्गत शितपेयाची एजंसी आहे. दि.१३ मे २०१४ रोजी अन्न सुरक्षा अधिकारी प्र.अ. उमप हे गोडावूनच्या तपासणीसाठी सार्वे यांच्याकडे आले होते. त्यात त्यांनी विविध मापदंडांतर्गत तपासणी करून त्रुट्यांची नोटीस बजावली.
तसेच सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन कार्यालयात येऊन १४ दिवसांच्या आत अहवाल सादर करण्यासंदर्भात कळविले. यशराज इंटरप्राईजेसचे मालक व विक्रेता धनराज सार्वे यांचे लहान भाऊ रामराज सार्वे यांनी प्रकरणातंर्गत सहायक आयुक्त कार्यालयात जावून संबंधित अधिकाऱ्यांना नोटीस दाखविले. त्यावर अन्न व सुरक्षा अधिकारी अशोक आठवले यांनी नोटीस वाचली. संबंधित इंटरप्राईजेसवर कुठलीही कारवाई न करण्यासंबंधीच्या उद्देशाने १५ हजार रूपयांची लाच मागितली. यावर तडजोडीनंतर आठवले यांनी सहा हजार रूपये देवून प्रकरण मिटविण्याचे सांगितले.
त्याअंतर्गत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रामराज सार्वे यांनी तक्रार नोंदविली. तक्रारीची पडताळणी करून आज सोमवारी संबंधित कार्यालयात सापडा रचण्यात आला.
सार्वे यांच्याकडून सहा हजार रूपयांची रक्कम स्विकारताना अशोक आठवले यांना रंगेहात पकडण्यात आले. आठवले यांच्याविरूद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ अन्वये कारवाई करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई एसीबीचे पोलीस उपायुक्त वसंत शिरभाते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधिक्षक प्रशांत कोलवाडकर, पोलीस निरीक्षक किशोर पर्वते, नायक पोलीस अशोक लुलेकर, भाऊराव वाडीभस्मे, गौतम राऊत, सचिन हलमारे, पराग राऊत, अश्विनकुमार गोस्वामी, मनोज पंचबुद्धे, शेखर देशकर, रसिका कंगाले, वाहन चालक मनोज चव्हाण यांनी केली. (शहर प्रतिनिधी)