लाच घेताना विस्तार अधिकारी जाळ्यात
By Admin | Updated: August 28, 2014 23:34 IST2014-08-28T23:34:19+5:302014-08-28T23:34:19+5:30
विद्यार्थीसंख्येची मान्यता वाढवून देण्यासाठी जिल्हा परिषदेतील शिक्षण विस्तार अधिकारी रमेश जानबाजी गणवीर याने पाच हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीनंतर गुरुवाराला चार हजार रुपयांची

लाच घेताना विस्तार अधिकारी जाळ्यात
चार हजारांची लाच : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
भंडारा : विद्यार्थीसंख्येची मान्यता वाढवून देण्यासाठी जिल्हा परिषदेतील शिक्षण विस्तार अधिकारी रमेश जानबाजी गणवीर याने पाच हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीनंतर गुरुवाराला चार हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. या घटनेने जिल्हा परिषदेत एकच खळबळ उडाली.
माहितीनुसार, तक्रारकर्त्यांचे लाखांदूर येथे वेदांत टंकलेखन विद्यालय आहे. या विद्यालयातील प्राचार्यांनी दि. ४ आॅगस्ट २०१४ रोजी विद्यार्थी संख्येची मान्यता वाढवून मिळण्यासंदर्भात जिल्हा परिषद (माध्यमिक) शिक्षण विभागाकडे प्रस्ताव सादर केला.
यासंदर्भात शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षण विस्तार अधिकारी गणवीर यांना या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर गणवीर यांनी ७ आॅगस्ट रोजी संस्थेला भेट देऊन विद्यार्थी संख्या वाढीचा प्रस्ताव सकारात्मक सादर करतो, असे सांगून प्राचार्यांकडे पाच हजार रुपयांची मागणी केली.
दि. ८ आॅगस्ट रोजी शिक्षणाधिकारी (माध्य.) यांनी विद्यार्थी प्रवेशक्षमता वाढविण्याचा सकारात्मक प्रस्ताव नागपूर शिक्षण उपसंचालक यांच्याकडे पाठविला. अहवाल सादर केल्यानंतर गणवीर याने तक्रारकर्ता यांच्याकडे भ्रमणध्वनीवरून त्या पैशाची मागणी केली.
दरम्यान, तक्रारकर्त्याने २७ आॅगस्ट रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रितसर तक्रार नोंदविली. त्यानंतर या विभागाच्या पथकाने गणवीर यांना पकडण्यासाठी सापळा रचला. आज गुरुवारी गणवीरला चार हजार रुपयांची लाच घेताना कार्यालयातच रंगेहात पकडण्यात आले.
याप्रकरणी त्याच्याविरुद्ध भंडारा पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायदा सन १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आले असून लाचेची रक्कम हस्तगत करण्यात आली.
या कारवाईत पोलीस उपअधीक्षक प्रशांत कोलवाडकर, पोेलीस निरीक्षक किशोर पर्वते, भातकुले, सहाय्यक फौजदार हेमंत उपाध्याय, युवराज उईके, अशोक लुलेकर, भाऊराव वाडीभस्मे, गौतम राऊत, शेखर देशकर, सचिन हलमारे, मनोज पंचबुद्धे, लोकेश वासनिक, पराग राऊत, अश्विन गोस्वामी, रसिका कंगाले, वाहन चालक चव्हाण यांनी सहभाग घेतला. (प्रतिनिधी)