लाच घेताना मंडळ निरीक्षक, तलाठ्याला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 00:11 IST2017-08-05T00:11:15+5:302017-08-05T00:11:42+5:30
अर्धा एकर जमिनीचे फेरफार करून देण्यासाठी दोन हजार रूपयांची लाच घेतल्याप्रकरणी साकोलीचे मंडळ निरीक्षक संजय बन्सोड (५५) व बोदरा येथील तलाठी उदाराम भोयर (५२) या दोघांना अटक करण्यात आली आहे.

लाच घेताना मंडळ निरीक्षक, तलाठ्याला अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : अर्धा एकर जमिनीचे फेरफार करून देण्यासाठी दोन हजार रूपयांची लाच घेतल्याप्रकरणी साकोलीचे मंडळ निरीक्षक संजय बन्सोड (५५) व बोदरा येथील तलाठी उदाराम भोयर (५२) या दोघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी दुपारी केली.
लाखनी तालुक्यातील मुरमाडी येथील रहिवाशी असलेल्या तक्रारदाराचे भाऊ प्रल्हाद रामटेके रा.जांभळी यांनी जांभळी येथील गट क्र. २९ मधील अर्धा एकर शेती जुन २०१७ मध्ये खरेदी केली होती. या शेतीचे फेरफार करण्यासाठी साकोली तहसील कार्यालयात जावून संबंधित रजिस्ट्रीची कागदपत्रे मंडळ निरीक्षक संजय बन्सोड यांच्याकडे दिले असता त्यांनी बोदरा साजाचे तलाठी उदाराम भोयर यांच्याकडे पाठविले. बन्सोड यांच्या सांगण्यावरून फेरफार करून देण्यासाठी तलाठी भोयर यांनी दोन हजार रूपयांची लाच मागितली. त्यानंतर तक्रारदाराने लाच न देता याप्रकरणाची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली.
या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा पडताळणी केली असता मंडळ निरीक्षक संजय बन्सोड यांनी लाचेची रक्कम तलाठी उदाराम भोयर यांच्याकडे देण्यासाठी सांगितले होते. त्यानंतर तलाठी उदाराम भोयर यांनी लाचेची रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार शुक्रवारला सापळा रचण्यात आला. दरम्यान दोन्ही आरोपींनी संगनमत करून लाचेची रक्कम तलाठी उदाराम भोयर यांच्या मार्फतीने स्वीकारताना अटक केली. याप्रकरणी साकोली पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायदाअंतर्गत दोघांविरूद्ध गुन्हे नोंदविले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक दिनकर सावरकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी, गौतम राऊत, सचिन हलमारे, अश्विनकुमार गोस्वामी, पराग राऊत, श्रीकांत हत्तीमारे, शेखर देशकर, अमोल खराबे यांनी केली.