लाच घेताना अर्बन बँकेचा वसुली अधिकारी जाळ्यात
By Admin | Updated: June 20, 2015 01:07 IST2015-06-20T01:07:16+5:302015-06-20T01:07:16+5:30
बँकेच्या कर्जाबाबत कायदेशीर नोटीस न पाठविण्यासाठी तीन हजारांची लाच घेताना लाखनी येथील अर्बन सहकारी बँकेच्या विशेष वसुली अधिकाऱ्याला रंगेहात पकडण्यात आले.

लाच घेताना अर्बन बँकेचा वसुली अधिकारी जाळ्यात
मागितली तीन हजारांची लाच : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
भंडारा : बँकेच्या कर्जाबाबत कायदेशीर नोटीस न पाठविण्यासाठी तीन हजारांची लाच घेताना लाखनी येथील अर्बन सहकारी बँकेच्या विशेष वसुली अधिकाऱ्याला रंगेहात पकडण्यात आले. खिस्तानंद नथानियल देवघरे असे या विशेष वसुली अधिकाऱ्याचे नाव आहे. ही कारवाई भंडारा लाचलुचपत विभागाने शुक्रवारी लाखनी येथे केली.
तक्रारकर्त्याने बँकेच्या माध्यमातून कर्ज घेवून ट्रॅक्टर खरेदी केले होते. कर्ज घेताना तक्रारदारांचे वडील जमानतदार आहेत. कर्जाचे हप्ते न भरल्यामुळे बँकेकडून कर्ज भरण्याबाबत तक्रारदाराच्या वडीलांना नोटीस देण्यात आले होते. बँकेचे कर्ज भरा अन्यथा तक्रारकर्ता व त्यांच्या वडिलांविरुध्द न्यायालयात प्रकरण दाखल करण्यात येईल. असे बोलून देवघरे यांनी तीन हजार रुपयांची लाच मागितली.
या आशयाची तक्रार भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे नोंदविण्यात आली. याआधारे एसीपीने सापळा रचून लाखनी येथे देवघरे यांना तीन हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडले त्यांच्याविरुध्द लाखनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत पोलीस निरीक्षक किशोर पर्वते, जीवन भातकुले, पोलीस हवालदार अशोक लूलेकर, गौतम राऊत, मनोज पंचबुध्दे, सचीन हलमारे, पराग राऊत, विनोद शिवनकर यांनी सहभाग घेतला. (प्रतिनिधी)