‘विकासाचा रोडमॅप’ कुठे?
By Admin | Updated: May 17, 2015 01:16 IST2015-05-17T01:16:45+5:302015-05-17T01:16:45+5:30
केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेतही याच पक्षाची सत्ता आहे.

‘विकासाचा रोडमॅप’ कुठे?
भंडारा : केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेतही याच पक्षाची सत्ता आहे. या संधीचे सोने करुन पदाधिकारी जिल्ह्याचा कायापालट करतील, अशी ग्रामीण भागातील लोकांना आशा होती. परंतु वास्तव वेगळेच आहे. पाच वर्षांच्या कार्यकाळात विकासाची दिशा भरकटली आहे. नवीन योजना राबविणे तर दूरच शासनाच्या आहे, त्या योजनाही सक्षमपणे राबविल्या जात नाही. कशाचाही ठावठिकाणा नाही. ऐनवेळी बैठका रद्द होत असल्याने स्थायी समिती वा विषय समित्यांच्या बैठकांना महत्त्व राहिलेले नाही. विकासाचा रोडमॅप ठरविताना त्या क्षेत्रातील रस्त्यांचा विकास घडविणे अगत्याचे असताना भंडारा जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रातील रस्त्यांना खऱ्या अर्थान ‘पैशांची’ संजीवनी मिळालेली नाही. भाजप नेत्यांच्याच गृह जिल्ह्यात हा प्रकार सुरू असल्यामुळे त्यांनी जिल्हा परिषदेला वाऱ्यावर तर सोडले नाही ना? असा प्रश्न जिल्ह्यातील जनतेच्या मनात निर्माण झाला आहे.
गरज ७५० कोटींची मिळाले ३३ कोटी
भंडारा जिल्हा परिषद क्षेत्रांतर्गत येणाऱ्या रस्त्यांच्या विकासासाठी दरवर्षी जवळपास ७५० कोटींची गरज आहे. तांत्रिक बाबीनुसार १ कि़मी. चा डांबरीकरण रस्त्याच्या बांधकामासाठी २० लक्ष रूपयांचा खर्च येतो. उद्दीष्टांची परिपूर्ती करण्यासाठी कोट्यवधी रूपये खर्च येईल. मागीलवर्षी भंडारा जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाला ३३ कोटी रूपये मिळाले. यापैकी २० कोटींची कामे पूर्ण झाली असून पाच कोटींची कामे पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. सन २०१५-१६ या चालू वित्तीय वर्षात नवीन बांधकाम संदर्भात प्रस्ताव वरिष्ठ विभागाकडे पाठविलेला नाही.
रस्त्याला जास्त क्षमतेचा फटका
जिल्हाअंतर्गत येणाऱ्या इतर जिल्हा मार्गावर क्षमतेपेक्षा जास्त साहित्यांची वाहतूक केली जात असल्याने त्याचा फटका रस्त्याला बसत असतो. सर्व्हेक्षणाअंती रस्त्याला सर्वात जास्त फटका रेतीच्या वाहतुकीमुळे पडतो. राज्य मार्ग किंवा प्रमुख जिल्हा मार्ग यापेक्षा इतर जिल्हा मार्गांची गुणवत्ता व दर्जा वेगळा असल्याने या रस्त्यांची स्थिती लवकरच खालावते. परिणामी त्याचा फटका जनसामान्यांना बसत आहे.
जिल्हा परिषद अंतर्गत ४,८६८ कि़मी. चे रस्ते
भंडारा जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत ४,८६८.६४ कि़मी. लांबीचे रस्ते आहेत. यापैकी इतर जिल्हा मार्गाची लांबी १५५३.५७ कि़मी. असून ग्रामीण मार्गांची लांबी ३३१५.०७ कि़मी. इतकी आहे. मुरूम रस्त्यांची लांबी २०३.८ कि़मी. आहे.
१,४५५ कि़मी. रस्ते बांधणीचे उद्दिष्ट
जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या एकूण ४८६८ कि़मी. रस्त्यांपैकी १४५५.३८ कि़मी. रस्त्याचे नूतनीकरण व दुरूस्तीसाठी उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. यात ग्रामीण व इतर जिल्हा मार्गाचे नूतनीकरण व दुरूस्तीचा समावेश करण्यात येणार आहे. मुरूम रस्त्यांच्या बांधणीसाठी १९२ कि़मी. चे रस्ते गृहीत धरण्यात आले आहे. टप्पा टप्प्याने रस्त्याचे बांधकाम करण्यात येत असते.
२० वर्षांसाठी रस्ता विकास आराखडा
भंडारा जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने २० वर्षांसाठी रस्ता विकास आराखडा तयार केला आहे. यात रस्त्याचे नूतनीकरण व दुरूस्तीसाठी किती निधी लागू शकतो व किती कि़मी. पर्यंत बांधकाम करायचे आहे, आदी तांत्रिक बाबींचा समावेश करण्यात आला आहे. रस्त्याचे खडीकरण, मुरूम टाकणे व डांबरीकरण करणे या तीन बाबींचा यामध्ये समावेश होत असतो.
यासह पांदन रस्त्यांच्या विकासाबाबतही यात विचार केला जात आहे. सध्या जिल्ह्यात १२८९.८८ कि़मी. लांबीचे पांदण रस्ते आहेत.