जिल्हा परिषद सदस्य दूध वाटप करतो तेव्हा...
By Admin | Updated: August 23, 2015 00:49 IST2015-08-23T00:49:33+5:302015-08-23T00:49:33+5:30
एकदा का राजकीय क्षेत्रात पदार्पण झाले की थाटमाट वाढतो, जूने दिवस विसरतो. परंतु काहींना जमिनीसोबत जुळून राहण्यात आनंद वाटतो, ..

जिल्हा परिषद सदस्य दूध वाटप करतो तेव्हा...
असाही लोकप्रतिनिधी : प्यारेलाल वाघमारे म्हणतात, पोट भरण्याचे काम करण्यात कमीपणा कसला?
भंडारा : एकदा का राजकीय क्षेत्रात पदार्पण झाले की थाटमाट वाढतो, जूने दिवस विसरतो. परंतु काहींना जमिनीसोबत जुळून राहण्यात आनंद वाटतो, म्हणूनच ‘ते’ जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतरही दूध वाटपाचे काम करीत आहेत. प्यारेलाल वाघमारे, असे या लोकप्रतिनिधीचे नाव आहे.
भंडारा शहराला लागून असलेल्या पांंढराबोडी येथील रहिवाशी असलेले वाघमारे यांची शेतीवर उपजिवीका आहे. शेतीला जोडधंदा म्हणून ते दूध विक्रीचा व्यवसाय करतात. परंतु, राजकारणाची आवड असल्यामुळे त्यांनी काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेतून कामाला सुरूवात केली. त्यानंतर युवक काँग्रेसमध्ये काम करु लागले. पाच वर्षांपूर्वी त्यांनी पंचायत समिती निवडणूक लढविली. त्यात त्यांचा पराभव झाला. पराभवाने खचून न जाता आपले सामाजिक कार्य सुरुच ठेवले. जनतेशी नाळ जोडून राहिले. उदरनिर्वाहासाठी दूध विक्रीचा व्यवसाय करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. दरम्यान, जुलै महिन्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत पक्षातंर्गत विरोध असतानाही काँग्रेसने निष्ठावान कार्यकर्ता म्हणून त्यांना उमेदवारी दिली. उमेदवारी मिळेपर्यंत वाघमारे हे दररोज पाच कि.मी. अंतरावरील भंडारा शहरात दूध वाटप करीत होते. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी दूध वाटपासाठी मुलाला ठेवले. निवडणूक जिंकल्यामुळे आता ते दूध वाटप करणार नाही, असे अनेकांना वाटले. परंतु कमीपणा बाळगतील ते ‘प्यारेलाल’ कसले. म्हणून आज जिल्हा परिषद सदस्य झाल्यावरही ते दुचाकीच्या दोन्ही बाजुला केटल्या अडकवून सकाळच्या सत्रात दूध वाटप करीत आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)
दूध विक्रीचा व्यवसाय नेहमीसाठी करणार
जिल्हा परिषद सदस्य झाले, आता हे शोभणारे नाही, असे विचारले असता ते म्हणाले, मी जमिनीसोबत जुळलेला कार्यकर्ता आहे. माझा प्रपंच या व्यवसायावर आहे. त्यामुळे या कामात मला कुठलाही कमीपणा वाटत नाही. परंतु कामाच्या व्यापामुळे आता दूध वाटपासाठी मुलगा ठेवलेला आहे. लोकांच्या सेवेने मोठा झाल्यामुळे लोकांच्या सेवेत कायम राहणार आहे. दूध विक्रीचा व्यवसाय आपण नेहमीसाठी करणार असल्याचे वाघमारे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.