कोल्हापुरी बंधाऱ्याचे पुनरूज्जीवन केव्हा होणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2016 01:10 IST2016-02-20T01:10:13+5:302016-02-20T01:10:13+5:30
उन्हाळ्यात पाण्यासाठी ओरड होत असते. ग्रामीण भागात नाला व नदीवर बांधण्यात आलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्यातून लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे.

कोल्हापुरी बंधाऱ्याचे पुनरूज्जीवन केव्हा होणार?
लोखंडी पाट्या चोरीला : जुन्या कोल्हापुरी बंधाऱ्यांना अच्छे दिनची प्रतीक्षा
राजू बांते मोहाडी
उन्हाळ्यात पाण्यासाठी ओरड होत असते. ग्रामीण भागात नाला व नदीवर बांधण्यात आलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्यातून लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. आघाडी शासनाच्या कार्यकाळात बांधण्यात आलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्याला युतीच्या कार्यकाळात अच्छे दिन येतील का असा प्रश्न आहे.
जलयुक्त शिवार अभियान ही युती सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेची जलदगतीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. यातून पाण्याचे नियोजन व व्यवस्थापन करण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. तथापि, कोल्हापुरी बंधाऱ्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात आहे. शेतीला पाणी मिळावे या उद्देशाने गावातून वाहणाऱ्या नदी नाल्यावर बंधाऱ्याची संकल्पना मांडण्यात आली होती.
गावोगावी मोठ्या प्रमाणात बंधारे बांधले गेले होते. २००१ ते २००५ या वर्षात कोल्हापुरी बंधारे बांधले गेले. बंधाऱ्यातून पाण्याच्या पातळीत वाढ होऊन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी मदत होईल, असा हेतू होता. कालांतराने मोहाडी तालुक्यातील कान्हळगाव, सिरसोली, मोहाडी, दहेगाव येथे ३२ ठिकाणी बांधलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्याची दुरावस्था झाली आहे. लाखो रूपये खर्च करून बांधण्यात आलेले हे बंधारे निकामी पडले आहेत.
कान्हळगाव (सिरसोली) येथील कोल्हापुरी बंधाऱ्याच्या लोखंडी प्लेट्स चोरीला गेले. पाच वर्षापूर्वी याच बंधाऱ्याच्या दुरुस्तीवर खर्च करण्यात आला. परंतु पाणी ‘ना अडले - ना जमिनीत जिरले’.
जिल्हा परिषद सिंचन विभागाकडून जुन्या बंधाऱ्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. मात्र बांधलेले कोल्हापुरी बंधारे क्षुल्लक किमतीच्या लोखंडी प्लेटअभावी दुरुस्तीची वाट बघत आहेत. शेतकऱ्यांचे हरितक्रांतीचे स्वप्न साकारण्यासाठी जुन्या कोल्हापुरी बंधाऱ्याची दुरुस्ती करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून प्रशासनाने मोहीम हाती घेण्याची गरज आहे. मात्र नवीन बंधारे बांधण्यासाठी लाखोंचा निधी उपलब्ध करून दिला जात आहे. कोल्हापुरी बंधाऱ्याची डागडुजी केल्यास उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या पाणी टंचाईवर मात करता येऊ शकते. उन्हाळ्यात नद्या कोरड्या पडतात. अशावेळी जनावरांना पाण्यासाठी भटकावे लागते. बंधाऱ्यात पाणी थांबले तर पाण्याच्या पातळीत वाढ होऊ शकते.
१५ गावांची निवड
जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत २०१६-१७ या वर्षासाठी मोहाडी तालुक्यातील महालगाव, धोप, आधळगाव, डोंगरगाव, पालडोंगरी, चिचोली, नवेगाव, ताडगाव, जांब, हिवरा या दहा गावांचा समावे, करण्यात आला आहे. २०१५-१६ या वर्षात १५ गावांची निवड करण्यात आली होती.