प्रस्तावित कामांना गती केव्हा मिळणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2015 00:39 IST2015-10-25T00:39:47+5:302015-10-25T00:39:47+5:30
जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रस्त्याची झालेली दयनीय अवस्था जीवघेणी ठरत आहे. मोठमोठे खड्डे आणि उखडलेली गिट्टी यामुळे वाहनाला अपघात होण्याचे प्रकार वाढले आहे.

प्रस्तावित कामांना गती केव्हा मिळणार?
रस्ते ठरताहेत जीवघेणे : पिचिंगची कामे निकृष्ट, अभियंत्यांचे दुर्लक्ष
भंडारा : जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रस्त्याची झालेली दयनीय अवस्था जीवघेणी ठरत आहे. मोठमोठे खड्डे आणि उखडलेली गिट्टी यामुळे वाहनाला अपघात होण्याचे प्रकार वाढले आहे. शिवाय हाती घेण्यात आलेली रस्त्याची पिचिंगची कामेही निकृष्ट होत आहे. मंजूर झालेल्या काही कामांनाही अजून मुहूर्त सापडलेला नाही. त्यामुळे आणखी किती दिवस खड्डामय रस्त्यांमधून मार्ग काढायचा, हा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
शहराचा काही भाग सोडला तर जिल्ह्याच्या बहुतांश भागातील परिस्थिती सारखीच आहे. जागोजागी तीन ते चार फूट रुंद आणि अर्धा फूट खोलपर्यंत खड्डे पडलेले आहेत. अशा रस्त्यांवरून मोठी वाहने तर दूर दुचाकींनाही मार्ग काढताना तारेवरची कसरत करावी लागते. एसटी, प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची ग्रामीण भागातील रस्त्यावर सतत वर्दळ असते. मात्र प्रत्येक ठिकाणी उसळणाऱ्या वाहनामुळे प्रवाशांना शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे.
ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी गावापासून काही अंतरावर असलेल्या शाळांमध्ये सायकलीने जातात. मार्गात असलेल्या मोठ्या वाहनांना मार्ग देण्याच्या प्रयत्नात त्यांना रस्त्याखाली उतरावे लागते. रस्त्याच्या दोन्ही बाजू वाहतुकीयोग्य राहिलेल्या नाही. अनेक ठिकाणी तर रस्ता समतल करण्याचेही सौजन्य दाखविले गेले नाही. एकाच वेळी दोन वाहने मार्गात असल्यास बाजू देण्याच्या प्रयत्नात ते मुख्य रस्त्याच्या खाली उतरतात. यातूनच अपघाताचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येते. अलिकडे काही ठिकाणी रस्त्याच्या डागडूजीचे काम हाती घेण्यात आले आहे. सदर कामही थातूरमातूर होत आहे. साधारण खड्डे डागडुजीपासून सोडून दिले जात आहे. केवळ मोठे खड्डे बुजविण्यात येत आहे. यासाठीही अतिशय निकृष्ट आणि अत्यल्प साहित्य वापरले जात आहे. या प्रकारात काही दिवसातच जैसे थे परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. संबंधित विभागाने या बाबीकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. जिल्ह्यातील विविध भागात रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहे. मात्र या कामांचा दर्जा कसा आहे, हे पाहण्याची तसदी संबंधित विभागाच्या अभियंत्यांकडून घेतली जात नाही. नागरिकांनी तक्रारी केल्यानंतरही दुर्लक्ष केले जात असल्याचा अनुभव आहे. (नगर प्रतिनिधी)