चकारा तीर्थस्थळाचा विकास कधी होणार ?
By Admin | Updated: May 19, 2017 01:00 IST2017-05-19T01:00:40+5:302017-05-19T01:00:40+5:30
ऐतिहासिक परंपरा लाभलेला तालुक्यात अनेक तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळे आहेत मात्र आजही लोकप्रतिनिधीच्या दुर्लक्षामुळे ही ठिकाणे ओस पडली आहे.

चकारा तीर्थस्थळाचा विकास कधी होणार ?
लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष : निधीची वानवा कायम
विशाल रणदिवे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अड्याळ : ऐतिहासिक परंपरा लाभलेला तालुक्यात अनेक तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळे आहेत मात्र आजही लोकप्रतिनिधीच्या दुर्लक्षामुळे ही ठिकाणे ओस पडली आहे. पवनी तालुक्यातील अड्याळ जवळील चकारा येथील ऐतिहासिक महादेवाचे मंदिर, नैसर्गिक पर्यटनस्थळ अद्यापही विकसित झालेले नाही.
इतिहासाची साक्ष देणारे हे स्थळ उपेक्षित आहे. पूर्व विदर्भातील भंडारा जिल्हा हा तलावाचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असला तरी नैसर्गिक वनस्पती आणि ऐतिहासिक वास्तू विखुरल्या आहेत. चकारा गाव हे ७०० लोकवस्तीच्या वास्तव्याच्या गावाच्या दक्षिणेला निसर्गरम्य पर्यटन स्थळ म्हणून मालगुजारी तलाव आहे. तलावाच्या पश्चिमेला टेकड्या आहेत. टेकडीवर विक्तुबाबाच्या विहाराची स्थापना केली आहे. तलावाजवळच असलेल्या महादेवाच्या मंदिराची स्थापना केली आहे. तलावाजवळच असलेल्या महादेवाच्या मंदिराची स्थापना १८५० मध्ये लिंग्यामल्ला पाटील यांचे पुत्र आबाजी व बाबाजी या बंधूनी केली असल्याचे सांगितले जाते. हे मंदिर वैनगंगेच्या तीरावर वसलेले असून येथील मुर्ती प्राचीन आहे. नक्षीकाम दगडावर कोरलेले आहे.
येथे हनुमान, श्री बालाजी देवस्थान, श्री गणेश, नवदुर्गा आदी देवतांचे वस्तीस्थान आहे. अड्याळ तिर्थक्षेत्राला लागुनच असल्याने येथे विदर्भ मध्यप्रदेश छत्तीसगढ येथून मोठ्या प्रमाणात भाविक येतात. येथील नक्षीकाम खजुराहो येथील कलेशी मिळतेजुळते आहे. परंतु येथे भाविक व पर्यटकांसाठी योग्य सुविधा नाही. परिसरातील झुडपी जंगलाचा हिरवागार शालु नेसल्यासारखी सृष्टी हिरवळीने नटून जाते. ही सृष्टी पर्यटकांचे व भाविकांचे लक्ष वेधून घेते.
ग्राम चकारा हे गाव म्हणजे आजचे अड्याळ. अख्खा महाराष्ट्रात येथील घोडायात्रा प्रसिध्द असली तरी तिचा उगमही चकारा येथून झाला ते असे चकारा या वस्तीवर ३०० वर्षापूर्वी कॉलरा या आजाराची वक्रदृष्टी झाल्याने येथील लोकांनी चकारा शेजारील अड्याळ टेकडी येथे स्थलांतरण केले. अड्याळ गावाची निर्मिती झाली. मात्र त्यांची कुलदैवता व मंदिरे चकारा येथेच असल्याने सदर मंदिरातून काढून रामनवमी ते हनूमान जयंतीपर्यंत नऊ दिवस यात्रा भरत असे. यावेळी मोठ्या प्रमाणात भक्तांची गर्दी असते.
कालांतराने चकारा येथून निघणारा घोडायात्रा रथ हा १०० ते १२० वर्षापूर्वी बंद करण्यात आल्याचे मंदिराचे अध्यक्ष भास्करराव पोटवार यांनी सांगितले. ऐतिहासिक दगडावरील नक्षीकामे, कोरलेली लेणी आजही ऐतिहासिक पुरावा देत आहे. याठिकाणी शासनाने दिलेले सभामंडप, बोअर केलेले हातपंप, मंदिराच्या मागेच तलाव व तलावाच्या चारही बाजुंनी वेढलेल्या टेकड्या व तलावाच्या पोटातून नागमोडी मार्गाने जाणारा रस्ता पर्यटकांचे लक्ष वेधून घेतो. शासनाने सदर पर्यटन स्थळाला क दर्जा दिलेल असला तरी मात्र कमेटीतील काही लोकाच्या शेतजमिनी असल्याने सदर प्रस्तावाला केराची टोपली दाखविण्यात आली असल्याचे बोलले जाते. या स्थळाजवळच लागुन असलेले नेरला डोंगर महादेव, भिवखिडकी जलाशय, अड्याळ येथील जागृत हनुमानाचे तिर्थस्थळ व येथूनच काही अंतरावर असलेल्या राष्ट्रीय गोसे प्रकल्प असल्यामुळे सदर विकास झाल्यास आणखीनच भर पडेल व बेरोजगारांना लघु व्यवसायासाठी चालना मिळू शकेल.
चकारा पर्यटन स्थळ म्हणून त्वरित विकसीत करुन सोयीसुविधा पुरविण्याची मागणी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य देवेंद्र हजारे, राजेंद्र ब्राम्हणकर, चंदु कोडापे, अतुल मुलकलवार, प्रकाश मानापूरे, कमलेश जाधव, राजु रोहणकर, राहुल फटीक, सारंग मुलकलवार, कलीम शेख, समीर एनपेड्डीवार, निरंजन देवईकर व परिसरातील पर्यटनप्रेमींनी केली आहे.