उपेक्षितांचे जीणे केव्हा संपणार?
By Admin | Updated: May 11, 2014 23:13 IST2014-05-11T23:13:07+5:302014-05-11T23:13:07+5:30
फ्लोरेन्स नाईटिंगल यांचा समृध्द वारसा घेऊन उपेक्षित, बहिष्कृत रुग्णांची सेवा करण्याचे पवित्र उद्देश असणार्या परिचारिकांना तुटपुंजे वेतन दिले जात आहे.

उपेक्षितांचे जीणे केव्हा संपणार?
भंडारा : फ्लोरेन्स नाईटिंगल यांचा समृध्द वारसा घेऊन उपेक्षित, बहिष्कृत रुग्णांची सेवा करण्याचे पवित्र उद्देश असणार्या परिचारिकांना तुटपुंजे वेतन दिले जात आहे. आजही परिचारिकांना विविध त्रासाला सामोरे जावे लागत असून त्यांच्या उपेक्षीत जगण्यांकडे शासन, प्रशासनाचे लक्ष गेलेले नाही. महाराष्ट्रातील ग्रामीण तथा निम सहकारी भागातील रुग्णांच्या सेवेसाठी परिचारिकांची नियुक्ती करण्यात आली आहे़ चांद्यापासून बांद्यापर्यंत व गडचिरोलीच्या नक्षलग्रस्त भागापासून चिखलदरा धारणीच्या कुपोषित भागात श्रध्देने व त्यागाने परिचारिका कर्तव्य पार पाडत आहेत़ वेतनाची चिंता न बाळगता त्यांनी कर्तव्यापासून व जवाबदारीपासून पाठ फिरविली नाही़ परिचारिकांना केवळ प्रसुतीच नाही तर प्राथमिक आरोग्य केंद्रात रात्रदिवस काम, योजनांची नोंदी ठेवणे, क्षयरोग, कृष्ठरोग, हायड्रोसिल, अंधत्व निवारण, पाण्याचे नमुने, लसीकरण, प्रतिनियुक्ती आदी कामे त्यांना करावी लागतात़ अनेक खेड्यात राहण्यासाठी अडचणी येत आहेत. डॉक्टर्स राहत नाही़ तरीही परिचारिका रुग्णांची सेवा करण्यात पुढे राहतात. काम करीत असताना या परिचारिकांना काही ठिकाणी चतुर्थ कर्मचार्यांपासून तर अधिकार्यांपर्यंत अपमानास्पद वागणुकीला सामारे जावे लागते़ तरीही परिचारिका खंबिरपणे तोंड देत रुग्णांच्या सेवेसाठी प्रयत्नरत आहेत. २०००-०५ आणि २००५-११ या वर्षाचा कुपोषण, माता बालमृत्यू, कुटुंब नियोजन, आदींचा आकडा जाहीर झाल्यास परिचारिकांच्या प्रयत्नांचे यश दिसून येईल, यात शंका नाही. (नगर प्रतिनिधी)