दिघोरीतील मंजूर वीज रोहित्र केव्हा लागणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2016 00:53 IST2016-01-21T00:53:43+5:302016-01-21T00:53:43+5:30
येथील शेतकऱ्यांनी शेतीला सिंचनाची कायमस्वरूपी सोय व्हावी व पाण्याअभावी पिके नष्ट नयेत, यासाठी लाखो रूपये खर्चून शेतामध्ये बोरवेल, ...

दिघोरीतील मंजूर वीज रोहित्र केव्हा लागणार?
दिघोरी (मोठी) : येथील शेतकऱ्यांनी शेतीला सिंचनाची कायमस्वरूपी सोय व्हावी व पाण्याअभावी पिके नष्ट नयेत, यासाठी लाखो रूपये खर्चून शेतामध्ये बोरवेल, विहीरी व फिल्टरची कामे केलीत. तसेच जवाहर रोजगार योजनेच्या माध्यमातूनही अनेक विहीरीचे बांधकाम पूर्ण झाले मात्र विज मंडळाच्या डोळेझाकपणामुळे अजुनही शेतकऱ्यांना विजेचा पुरवठा होऊ शकला नाही.
दिघोरी (मोठी) येथे सहा नवीन ट्रॉन्सफॉर्मर मंजूर झाले असल्याचे विज मंडळाचे कर्मचारी व अधिकारी मागील सहा महिन्यांपासून सांगत आहेत. जवळपास पन्नासचेवर शेतकऱ्यांनी वीज जोडणीचे डिमांड भरले आहे. काहींनी तर मागील सहा महिन्यांचे अगोदरपासून डिमांड भरलेला आहे, असे असले तरी अजूनपर्यंत ट्रॉन्सफॉर्मर लावण्यासाठी वीज मंडळाद्वारे प्रयत्न चालले असल्याचे दिसून येत नाही.
मागेल त्याला शेतीच्या सिंचनासाठी विज द्या व तेही अवघ्या दोन महिन्याच्या कालावधीत विज पुरवठा करा, असे आदेश उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्व विज विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले असले तरी वीज विभागाचे अधिकारी ऊर्जामंत्र्यांचे आदेशाची पुर्तता करण्यास असमर्थ ठरत आहेत. त्यामुळे काम कमी व आराम जास्त करण्यातच वीज मंडळाचे अधिकारी व्यस्त असल्याचे दिसून येते.
दिघोरीतील अनेक ट्रॉन्सफॉर्मर ओव्हरलोड असल्यामुळे शेतकऱ्यांना पूर्ण दाबाची वीज पुरवठा होऊ शकत नाही. यामुळे शेतकऱ्यांच्या मोटारपंपाचे बरेच नुकसान होत आहे. मध्येच कमी दाबाचा विज पुरवठा झाल्यास अनेक शेतकऱ्यांच्या मोटारपंप जळाले त्यामुळे बराच मोठा आर्थिक ताण विज मंडळामुळे शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. प्रत्येक आठवड्यात किमान तीन-चार मोटारपंप विद्युत मंडळाच्या हलगर्जीपणामुळे जळत असल्याचे अनेक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. उपमुख्य कार्यकारी अभियंता साकोली यांना भ्रमणध्वनीद्वारे ट्रॉन्सफॉर्मरबाबत माहिती विचारली असता भ्रमणध्वनीवर माहिती देण्यास त्यांनी चक्क नकार दिला. माहिती हवी असल्यास कार्यालयात यावे, असे सांगितले. एकंदरीत वीज जोडणीसाठी शेतकऱ्यांना पायपीट करावी लागत आहे. याकडे वीज वितरण कंपनीने लक्ष द्यावे. (वार्ताहर)