लाच घेताना इसम जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2017 00:32 IST2017-06-28T00:32:31+5:302017-06-28T00:32:31+5:30
नमूद गुन्ह्यातून बाहेर काढण्याकरिता तपासी अधिकाऱ्यांची ओळख आहे असे सांगून १५ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या एका इसमाला आज रंगेहाथ पकडण्यात आले.

लाच घेताना इसम जाळ्यात
साकोली पोलीस ठाण्यातील घटना : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : नमूद गुन्ह्यातून बाहेर काढण्याकरिता तपासी अधिकाऱ्यांची ओळख आहे असे सांगून १५ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या एका इसमाला आज रंगेहाथ पकडण्यात आले. श्रीकृष्ण केवळराम माहुरे रा.चारगाव असे या लाचखोर इसमाचे नाव असून ही कारवाई आज साकोली पोलीस ठाण्यात करण्यात आली.
या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग भंडाराने साकोली पोलीस ठाण्यात माहुरे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार हा विद्यार्थी असून परसटोला येथील रहिवासी असून त्यांच्या मामेभावाविरुद्ध साकोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी मामेभावाला २६ जून २०१६ रोजी अटक करण्यात आली होती. त्या अनुषंगाने तक्रारदार हे पोलीस ठाणे साकोली येथे गेले असता तेथे उपस्थित असलेले श्रीकृष्ण केवळराम माहुरे याने तक्रारदाराला मी भ्रष्टाचार निर्मूलन समिती साकोलीचा सदस्य असून संबंधित प्रकरणातील तपासी अधिकाऱ्यांशी ओळख असल्याचे सांगितले.
तसेच तक्रारदाराला प्रलोभन देऊन त्यांच्या मामेभावाला नमूद गुन्ह्यातून बाहेर काढण्याकरिता १५ हजार रुपयांची लाच मागितली. माहुरे याला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग भंडारा याच्याकडे करण्यात आली. तक्रारीच्या संदर्भाने शहानिशा करून मंगळवारला कारवाईच्या दृष्टीकोनातून सापळा रचण्यात आला. यात श्रीकृष्ण माहुरे याला १५ हजार रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. साकोली पोलीस ठाण्यात कलम ८ लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ अन्वये माहुरे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस अधीक्षक दिनकर सावरकर, पोलीस निरीक्षक डुडेश्वर पारधी, पोलीस नायक गौतम राऊत, सचिन हलमारे, अश्विन गोस्वामी, पराग राऊत, श्रीकांत हत्तीमारे, शेखर देशकर, अमोल खराबे यांनी फत्ते केली.