मोहाडीत दर घसरताच पेट्रोलपंप होतात बंद
By Admin | Updated: January 18, 2015 22:40 IST2015-01-18T22:40:17+5:302015-01-18T22:40:17+5:30
शहरात भारत व इंडियन कंपनीचे असे दोन पेट्रोलपंप आहेत. पेट्रोल डिझेलचे भाव वाढले तर हे पेट्रोल पंप बंद होत नाही. मात्र भाव कमी झाले तर दोन्ही पेट्रोलपंप दिवसभरासाठी किंवा दोन

मोहाडीत दर घसरताच पेट्रोलपंप होतात बंद
मोहाडी : शहरात भारत व इंडियन कंपनीचे असे दोन पेट्रोलपंप आहेत. पेट्रोल डिझेलचे भाव वाढले तर हे पेट्रोल पंप बंद होत नाही. मात्र भाव कमी झाले तर दोन्ही पेट्रोलपंप दिवसभरासाठी किंवा दोन दिवसांसाठी बंद करण्यात येतात. यामुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करवा लागतो. यावर प्रशासनाने त्वरित तोडगा काढावा, अश्ी मोहाडी व परिसरातील वाहनधारकांची मागणी आहे.
मोहाडी शहरात भारत पेट्रोलियमचा शहराच्या मधोमध राज्यमार्गावर पेट्रोलपंप आहे. तर इंडियन पेट्रोलियमचा पेट्रोलपंप हा शहराच्या बाहेर एमआयडीसी जवळ राज्यमार्गावर आहे. पेट्रोल, डिझेलचे दर १६ जानेवारीला मध्यरात्रीपासून कमी झाले. त्यामुळे हे दोन्ही पेट्रोलपंप १७ जानेवारीला सकाळपासूनच बंद करण्यात आले होते. मात्र यामुळे वाहन धारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागला. आजकाल प्रत्येकाच्याच घरी दुचाकी आहेत. सगळी कामे दुचाकीनेच केले जातात. ग्रामीण भागात अनेकजण दररोज ५० किवां १०० रुपयाचे पेट्रोल भरतात तर शेतकरी आपल्या ट्रॅक्टरमध्ये एक दोन दिवस पुरेल इतकेच म्हणजे ते दहा लिटर डिझेल टाकतात. त्यामुळे येथील पेट्रोल पंपावर दररोज गर्दी असते. आवश्यक तेवढेच पेट्रोल, डिझेल वाहनात घालत असल्याने एखादवेळ पेट्रोल पंप बंद असल्यास अश्या वाहनधारकांची मोठी पंचाईत होते. १७ जानेवारीलाही असेच काहिसे घडले. काहिंना आरोग्य केंद्रात जायचे होते तर काहिना अतिआवश्यक कामासाठी बाहेरगावी जायचे होते. त्यामुळे हे वाहनधारक पेट्रोलपंप धारकांला विणवणी करत होते. मात्र पेट्रोलपंप धारकांनी त्यांचे म्हणणे ऐकले नाही. आम्ही आपले नुकसान कसे करणार असे उत्तर त्यांच्याकडून देण्यात येत होते.
दुपारनंतर इंडियन कंपनीच्या पेट्रोलपंप सुरु करण्यात आला. मात्र तो शहराच्या बाहेर असल्याने अनेकांना त्याची माहिती मिळाली नाही. मात्र भारत पेट्रोलीयमचा पेट्रोलपंप सायंकाळपर्यंत सुरु करण्यात आला नाही. भारत पेट्रोलपंपावर नागरिक सुविधांचा अभाव आहे. या पेट्रोलपंपावर छत नाही, शौचालय, मुतारी घर आहे पण तो बंद स्थितीत आहे. हवा भरण्याची मशिन नादुरुस्त आहे. पिण्याच्या पाण्याची सोय नाही. फक्त एक माठ ठेवले आहे. तेही शुध्द नाही. पेट्रोलपंपधारक दर वाढल्यास पेट्रोलपंप बंद करीत नाही. मात्र दर कमी होताच पेट्रोलपंप एक ते दोन दिवसासाठी बंद करण्यात येते. याकडे प्रशासनाने जातीने लक्ष घालुन वाहनधारकांची होत असलेली कुंचबना थांबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. (शहर प्रतिनिधी)