आले कधी? गेले कधी?

By Admin | Updated: August 15, 2015 01:01 IST2015-08-15T01:01:49+5:302015-08-15T01:01:49+5:30

मागच्या सरकारनं कर्ज करुन ठेवलं, मागच्या सरकारनं भ्रष्टाचार केलं, मागच्या सरकारनं अमकं केलं, मागच्या सरकारनं तमकं केल, म्हणूनच तर जनतेने दुसर लग्न केलं असा मध्यंतरी वॉटसअ‍ॅपवर संदेश फिरला.

When did you come? Ever gone? | आले कधी? गेले कधी?

आले कधी? गेले कधी?


मागच्या सरकारनं कर्ज करुन ठेवलं, मागच्या सरकारनं भ्रष्टाचार केलं, मागच्या सरकारनं अमकं केलं, मागच्या सरकारनं तमकं केल, म्हणूनच तर जनतेने दुसर लग्न केलं असा मध्यंतरी वॉटसअ‍ॅपवर संदेश फिरला. या संदेशात बऱ्याचअंशी तथ्य होत. त्यांनी काही केलं नाही म्हणून तुम्हाला संधी दिली असा त्याचा अर्थ होत असला तरी सरकार कोणतेही येवो परिस्थती मात्र सारखीच असते, याचा प्रत्यय भंडारा जिल्हावासियांना कायम येत आहे. वर्षभरापूर्वी आघाडीचे सरकार होते आता युतीचे सरकार आहे. माणसे बदलली तेवढी परिस्थिती मात्र ‘जैसे थे’च आहे. त्यावेळेचे पालकमंत्री आणि आताचे पालकमंत्री यांना ही जबाबदारी जबरदस्तीने लादली तर नसावी ना, असे म्हणने अतिशयोक्तीचे ठरणार नाही.
पालकमंत्रीपद हे बिरूद नाही. शाश्वत विकासासाठी, जनतेची गाऱ्हाणी ऐकण्यासाठी, त्यातून समस्या सोडविण्यासाठी एकूणच सरकारवरचा ताण कमी व्हावा यासाठी ही जबाबदारी सोपविण्यात येत असते. मात्र अलिकडच्या काळात पालकत्वाची जबाबदारी पालकमंत्री विसरल्यागत झाले आहे. युती सरकारने सार्वजनिक आरोग्य मंत्री असलेले दीपक सावंत यांच्यावर भंडारा जिल्ह्याची जबाबदारी सोपविली. पेशाने डॉक्टर असलेल्या डॉ.सावंत यांच्याकडून खूप अपेक्षा असल्या तरी त्यांच्या आरोग्य खात्यामार्फत येणारी महिला रूग्णालयाची समस्या ही त्यातली महत्त्वाची समस्या आहे.
भंडारा शहरात स्वतंत्र महिला व बाल रूग्णालय मंजूर होऊन अडीच वर्षाचा काळ लोटला आहे. परंतु रूग्णालयाला जागा मिळत नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे महाराष्ट्र दिनी प्रविण उदापुरे या तरुणाने उपोषण केले. पाच दिवसानंतर आरोग्यमंत्र्यांनी उपोषण सोडविले. जागा शोधण्याचे जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले असून १५ आॅगस्टला स्वत: भूमिपूजन करणार असे अभिवचन देऊन ते परतले. परंतु प्रशासनाला आतापर्यंत जागा सापडलेली नाही. काय गरज होती उदापुरे या तरुण कार्यकर्त्याला उपोषण करण्याची, त्यांच्या घरचेच केवळ या रूग्णालयात जाणार आहेत कां? परंतु समाजासाठी देणे असल्याच्या भावनेतून हा तरुण महिला रूग्णालय व्हावे, यासाठी धडपडत आहे. गरिबांसाठी रूग्णालय व्हावे यासाठी कुणी समोर येत नाही यासाठी त्याने उपोषण केले. मात्र निगरगट्ट शासन - प्रशासनाला त्याची हाक एैकू आली नाही. आली असली तरी त्यावर अंमलवजावणी मात्र झाली नाही.
भंडारा जिल्ह्यात महिला व गर्भवती मातांचा प्रश्न बिकट असून दोन वर्षात सामान्य रुग्णालयात १० महिलांचा प्रसुतीदरम्यान मृत्यू झाला याचा अर्थ असा की वर्षात पाच तर तीन महिन्यात दोन महिलांना प्राण गमवावे लागते, जर हे प्रमाण आहे तर सरकारला आता जाग आली पाहिजे. ४०० खाटांच्या सामान्य रुग्णालयात २०० च्यावर खाटा प्रसुती व महिला रुग्णांसाठी वापरण्यात येतात. सामान्य रूग्णालयात सिझेरियन शस्त्रक्रियेचे प्रमाण ५ ते १५ टक्के मापदंड असताना ४३ ते ४८ टक्के सिझेरियन शस्त्रक्रिया करण्यात येतात, ही निश्चितच आश्चर्याची बाब आहे. २०१३-१४ मध्ये ७,३८४ प्रसुतीपैकी ३,२२४ सिझेरीयन प्रसुती झाल्या. २०१४-१५ मध्ये ८,०८० प्रसुतीपैकी ३,६२४ म्हणजे ४४.८१ टक्के प्रसुती सिझेरीयन झाल्या आहेत. सामान्य रुग्णालयात वैद्यकिय अधिकाऱ्यांच्या २५ जागा तर परिचारिकांसह ४४ जागा रिक्त आहेत. सामान्य रूग्णालयात प्रसुतीसाठी येणाऱ्या ७५ ते ८० टक्के महिला रुग्णांमध्ये रक्ताची कमी या आजाराने ग्रस्त असल्याचे दिसून आले आहे. त्यातच कोट्यवधीचे सीटी स्कॅन युनिट व अत्याधुनिक उपकरणे असूनही डॉक्टरांच्या रिक्त पदांमुळे रुग्णांना हाल सोसावे लागत आहे, ही शोकांतिका नाही तर काय?
तत्कालीन पालकमंत्री रणजित कांबळे यांना झेंडा टू झेंडा मंत्री असे म्हणायचे. त्यामुळे ते केवळ जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला येणे पसंद करायचे. सोयीनुसार येणार आणि सोयीनुसार जाणार असा त्यांचा दौरा असायचा. आताचे पालकमंत्री डॉ.सावंत हे शुक्रवारला सायंकाळी नवनिर्मित वास्तुच्या उद्घाटनासाठी सामान्य रूग्णालयात आले आणि उद्घाटन आटोपून परतले. मुक्कामासाठी भंडारा हे कदाचित सोयीचे ठिकाण नसणार म्हणून ते नागपूरला मुक्कामी गेले. पालकत्व स्वीकारल्यानंतर उद्या पाचव्यांदा त्यांची भंडारा भेट राहणार असली तरी त्यांचा शासकीय दौरा ७.४५ ते ११.१५ असा म्हणजे केवळ साडेतीन तासांचा राहणार आहे. त्यामुळे या साडेतीन तासात जितक्या समस्या सुटतील, तेवढ्या ते सोडवतील आणि परत जातील.
पालकमंत्री झाल्यानंतरच्या पहिल्या भेटीत त्यांचा कार्यकर्त्यांनी सत्कार केला. त्यावेळी पक्ष संघटन वाढवा, मी तुमच्या पाठिशी आहे, अशी ग्वाही दिली. त्यामुळे शिवसैनिकांना जोश आला होता. परंतु जिल्हा परिषद निवडणुकीत ते एकदाही फिरकले नाहीत. पालकमंत्रीपद असल्यामुळे चार जागा जिंकण्यासाठी पदाचा लाभ झाला असता, अशा शिवसैनिकांच्या भावना होत्या. मात्र त्याही फोल ठरल्या. शनिवारच्या साडेतीन तासांच्या शासकीय दौऱ्यात ते किमान महिला रुग्णालयाच्या जमिनीचा तिढा सोडवतील, अशी अपेक्षा करु या...

Web Title: When did you come? Ever gone?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.