प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत गळते तेव्हा
By Admin | Updated: July 30, 2015 00:38 IST2015-07-30T00:37:21+5:302015-07-30T00:38:09+5:30
मोहाडी तालुक्यातील जांब आरोग्य केंद्राच्या इमारतीला तडे गेले असून छतातून पाणी गळत असते. त्यामुळे या आरोग्य केंद्रात येणारा प्रत्येक जण ‘टिप टिप बरसा पाणी’ असे गीत पुटपुटत असतात.

प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत गळते तेव्हा
जांब येथील प्रकार : इमारतीवर ताडपत्रीचे आच्छादन, कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया बंद
रमेश लेदे जांब (लोहारा)
मोहाडी तालुक्यातील जांब आरोग्य केंद्राच्या इमारतीला तडे गेले असून छतातून पाणी गळत असते. त्यामुळे या आरोग्य केंद्रात येणारा प्रत्येक जण ‘टिप टिप बरसा पाणी’ असे गीत पुटपुटत असतात.
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या छतासह इमारतीला तडे गेल्यामुळे पावसाळ्यामध्ये ही इमारत गळत आहे. इमारत कधी कोसळेल याचा नेम नाही, अशी स्थिती सध्या आहे. यामुळे येथे उपचारासाठी येणाऱ्या रूग्णांच्या चेहऱ्यावर भितीचे सावट असते. सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे छत गळतीपासून वाचण्यासाठी आरोग्य प्रशासनाने शक्कल लढवून छताची दुरूस्ती करण्याऐवजी त्यावर ताडपत्री टाकून पाण्याच्या गळतीला आवर घालण्याचा प्रयत्न केला आहे. इमारत ईमारत नादुरूस्तावस्थेत असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांना रूग्णांची सेवा करताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. रुग्णाची गैरसोय होत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. आरोग्य केंद्राची इमारत मागील काही वर्षापासून गळत असून यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांना अनेकदा कळविण्यात आले. मात्र, आरोग्य केंद्राच्या इमारतीची दुरूस्ती करण्यात आली नाही. ज्या खोलीमध्ये कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया केली जाते त्या खोलीतही पाणी गळत असल्यामुळे मागील दोन वर्षापासून जांब येथे कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया करणे बंद झाल्यामुळे कुटूंब नियोजनासाठी मोहाडी ग्रामीण रुग्णालयात जावे लागते. आरोग्य विभागाने याचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोग्य केंद्राची इमारतीचे बांधकाम करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.