शेतजमिनीचा मोबदला मिळणार काय?
By Admin | Updated: December 13, 2015 00:27 IST2015-12-13T00:27:32+5:302015-12-13T00:27:32+5:30
बावनथडी सिंचन प्रकल्प बांधकाम होण्यासाठी ४० वर्षांपासून कार्य सुरु आहे. मात्र या प्रकल्पांतर्गत कालव्यांसाठी जमीन संपादित केलेल्या शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला ....

शेतजमिनीचा मोबदला मिळणार काय?
राजेंद्र पटले यांचा सवाल : आंदोलनाचा इशारा
भंडारा : बावनथडी सिंचन प्रकल्प बांधकाम होण्यासाठी ४० वर्षांपासून कार्य सुरु आहे. मात्र या प्रकल्पांतर्गत कालव्यांसाठी जमीन संपादित केलेल्या शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला अजूनही पूर्णपणे मिळालेला नाही. त्यामुळे त्या शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे.
अनेक वेळा निवेदने व कार्यालयाच्या चकरा मारुनही शेतकऱ्यांच्या पदरी घोर निराशा आली. यावर शासनाने न्यायालयात दिले गेलेले कारण योग्य नसून या संदर्भात शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला द्यावा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा शेतकरी नेते तथा किसान गर्जनेचे संस्थापक राजेंद्र पटले यांनी दिला आहे.
शासन ४० वर्षांपासून बावनथडी सिंचन प्रकल्प सुरु करु शकला नाही. अजूनही ३० टक्के कालव्याचे काम शिल्लक आहे. बावनथडी कालव्याच्या वितरिका पूर्ण न झाल्याने मुख्य कालव्याला फोडून पाणी नेण्याच्या घडत असतात. यासाठी कालव्याचे उर्वरित काम पूर्ण करणे गरजेचे आहे.
उच्च न्यायालयात सादर केलेल्या माहितीमध्ये आतापर्यंत प्रकल्पग्रस्तांना ५ कोटी ८७ लक्ष ९४ हजार रुपयांची मदत दिली असल्याचे म्हटले आहे.
तरीही शेतकऱ्यांना पूर्णपणे मोबदला मिळाला नाही. तहसील कार्यालयात शेतकऱ्यांसाठी याबाबत स्वतंत्र कक्ष निर्माण करण्याची गरज असताना मोहाडी व तुमसर तालुका प्रशासनाने याबाबत कारवाई केली नाही.
याबाबत न्यायालयात दाद मागणार असल्याचे पटले यांनी कळविले आहे. कालव्यात गेलेल्या शेतजमिनीचा तत्काळ मोबदला द्यावा अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरतील अशा इशाराही राजेंद्र पटले यांनी निवेदनातून दिला आहे. (प्रतिनिधी)