अन् काय म्हणता! धानाचे पैसे जमा झाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:34 IST2021-03-25T04:34:09+5:302021-03-25T04:34:09+5:30
पालांदूर : चातकासारखी धान चुकाऱ्याची प्रतीक्षा सुरू हाेती. पीक कर्ज भरण्याची तारीख जवळ येऊ लागली हाेती. काय होईल या ...

अन् काय म्हणता! धानाचे पैसे जमा झाले
पालांदूर
: चातकासारखी धान चुकाऱ्याची प्रतीक्षा सुरू हाेती. पीक कर्ज भरण्याची तारीख जवळ येऊ लागली हाेती. काय होईल या विवंचनेत शेतकरी असताना लोकमतमध्ये वृत्त प्रकाशित झाले आणि शेतकऱ्यांच्या खात्यात बुधवारी १९ कोटी रुपयांचे चुकारे जमा झाले. दीड महिन्यापासून प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांचा यावर विश्वासच बसत नव्हता. अनेकांच्या तोंडून, काय म्हणता धानाचे पैसे जमा झाले असे शब्द गावखेड्यात ऐकायला येत होते.
जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचे धानाचे चुकारे रखडले होते. बोनसचाही पत्ता नाही. अशा परिस्थितीत ३१ मार्चपर्यंत पैसे भरले नाही तर शून्य व्याज दर योजनेचा लाभ कसा मिळणार याची चिंता शेतकऱ्यांना लागली हाेती. शेतकऱ्यांचे वास्तव लोकमतने बुधवारी साहेब, पीक कर्ज भरायचा आहे, धानाचे पैसे द्या जी! असे वृत्त प्रसिद्ध केले. महिना-दीड महिन्यांपासून प्रलंबित असलेले धानाचे चुकारे थेट ऑनलाईन पद्धतीने सुमारे १९ कोटी रुपये जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले. त्यामुळे पीक कर्जाची रक्कम भरण्याकरिता शेतकरी वर्गाला मोठी सुविधा उपलब्ध झाली.
पालांदूर येथील सेवा सहकारी संस्थेचे खरेदी केंद्रावरील १९९८ शेतकऱ्यांना १० कोटी ४२ लाख २३ हजार ९३९ रुपये खात्यात वळते करण्यात आले. ८७ शेतकऱ्यांचे २३०२ क्विंटल धानाचे रक्कम ४३ लाख १३६ रुपये शिल्लक आहे.
पणन कार्यालयाच्या सहकार्यामुळे शेतकरी वर्गाला विहित वेळेत पीक कर्जाची रक्कम भरण्याकरिता मदत झाली. विहित वेळेत शासनाची शुन्य व्याजदर योजना शेतकऱ्यांना फलदायी ठरण्यास मदत झाली.
कोट
शेतकऱ्यांनी अगदी सकाळपासूनच कार्यालयात कर्ज भरण्यासाठी हजेरी लावलेली आहे. आमचा शेतकरी नियमित असून शासनाच्या धोरणानुसार पीक कर्जाची वसुली नियमितपणे भरीत आहे. भंडारा जिल्ह्यात आमची सेवा सहकारी संस्था वसुली व पीककर्ज वाटपात अग्रेसर आहे.
विजय कापसे
अध्यक्ष विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था पालांदूर