दिव्यांगांच्या प्रमाणपत्रासाठी मोहीम राबविणार

By Admin | Updated: September 8, 2016 00:35 IST2016-09-08T00:35:59+5:302016-09-08T00:35:59+5:30

दिव्यांगांसाठी शासनाची पेन्शन योजना असून या योजनेत लाभार्थी निवडीसाठी अपंगत्वाच्या तसेच वयाच्या प्रमाणपत्राची आवश्यकता असते.

We will campaign for Divya's certificate | दिव्यांगांच्या प्रमाणपत्रासाठी मोहीम राबविणार

दिव्यांगांच्या प्रमाणपत्रासाठी मोहीम राबविणार

जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी : आढावा बैठकीत निर्देश, तालुकास्तरावर घेणार आरोग्य तपासणी मेळावा 
भंडारा : दिव्यांगांसाठी शासनाची पेन्शन योजना असून या योजनेत लाभार्थी निवडीसाठी अपंगत्वाच्या तसेच वयाच्या प्रमाणपत्राची आवश्यकता असते. जिल्ह्यातील सर्व दिव्यांगांना प्रमाणपत्र प्राप्त व्हावे, यासाठी जिल्हा प्रशासन विशेष मोहिम राबविणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.
जिल्ह्यातील आरोग्य सेवेचा आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एल. अहिरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवी धकाते व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उईके उपस्थित होते.
प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आरोग्य तपासणी मेळावा घेण्याचे प्रस्तावित असून यासाठी आरोग्य विभागाने नियोजन करुन तात्काळ सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. शासनाच्या विविध योजनाचा लाभ दिव्यांग व्यक्तींना मिळण्यासाठी लागणाऱ्या प्रमाणपत्रासाठी विशेष मोहिम राबविण्याचे जिल्हा प्रशासनाने ठरविले असून या मोहिमेत आरोग्य विभागाच्या सर्व डॉक्टर्सनी सहभागी होणे बंधनकारक असणार आहे. या मोहिमेची तारीख लवकरच ठरविण्यात येणार असून दिव्यांगांना वयाचा दाखला देण्याची जबाबदारी वैद्यकीय अधिकारी यांची असणार आहे, असे जिल्हाधिकारी म्हणाले.
महसूल विभागाच्या वतीने प्रत्येक तालुक्याला मंडळ मुख्यालयी समाधान शिबीर घेण्यात येतात. या शिबीराला जोडून आरोग्य विभागाने आरोग्य मेळावे घेऊन सामान्य मानसाला आरोग्य सुविधा पुरवाव्या असे त्यांनी सांगितले. संस्थात्मक प्रसूतीचे उद्दिष्टपूर्ण करण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या. अवयवदान ही सामाजिक चळवळ म्हणून राबवावी असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले की, अवयवदानासाठी लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात यावी.
या बैठकीत जिल्हाधिकारी यांनी राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम, राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम, राष्ट्रीय कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रम, राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रम, जननी सुरक्षा योजना, जिल्हा एड्स नियंत्रण समिती, किटकजन्य साथ, जलजन्य साथ, हिवताप, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन इत्यादी आरोग्य विषयक विषयांचा आढावा घेतला. (नगर प्रतिनिधी)

Web Title: We will campaign for Divya's certificate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.