शेतशिवारात दारुचे पाऊच; शेतकरी त्रस्त
By Admin | Updated: June 30, 2017 00:33 IST2017-06-30T00:33:06+5:302017-06-30T00:33:06+5:30
सिहोरा परिसरात गावठी दारु विक्रीत निरंतर वाढ होत असल्याने नागरिकांचे नाकी नऊ आले आहे.

शेतशिवारात दारुचे पाऊच; शेतकरी त्रस्त
गावठी दारुची खुलेआम विक्री : महिला करणार आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : सिहोरा परिसरात गावठी दारु विक्रीत निरंतर वाढ होत असल्याने नागरिकांचे नाकी नऊ आले आहे. यातच गावठी दारु विक्रेत्यांनी हायटेक प्रणाली अंमलात आणल्याने शेतकऱ्यांची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे. या दारुच्या विक्रीवर अंकुश घालताना प्रशासनाला अपयश आल्याने महिला आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.
सिहोरा परिसरात परवाना प्राप्त देशी विदेशी दारु विक्रीचे दुकाने बंद आहेत. यामुळे गावठी दारु विक्रेत्यांना सुगीचे दिवस आले आहे. दारुबंदी असणाऱ्या गावातच नवीन व्यवसायीक डोके वर काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. बावनथडी नदीच्या खोऱ्यात आणि टेमनी गावाच्या हद्दीत असणाऱ्या घनदाट जंगलात गावठी दारुचे गाळप करण्यात येत आहे. या दारु विक्रेत्यांना एका माफीयामार्फत मोहफुलांचा पुरवठा करण्यात येत आहे.
मध्यप्रदेश राज्य सीमेलगत असणाऱ्या बपेरा आणि देवसर्रा गावात गावठी दारु विक्रीचे अड्डे आहे. या दोन्ही गावातील दारु विक्रीवर लगतचे चार गावातील मद्यप्राशन करणारे अवलंबून आहेत. या गावात प्लास्टीक पाऊचचा उपयोग करण्यात येत नाही.
परंतु प्रमुख अड्डा असणाऱ्या ठेरकर टोळी तथा चुल्हाड शेजारी असणाऱ्या बसस्थानक परिसरात नाकी नऊ आणणारे प्रकार निदर्शनास आले आहे. डावा कालवा असणाऱ्या नहरावर सायंकाळी या बाबीला सुरुवात होत असते. या कालव्यावर ग्लास मधून गावठी दारुची विक्री होत नाही. दारु विक्रेत्यांनी हायटेक प्रणाली अमलात आणली आहे. पाऊच मधून गावठी दारुची विक्री करण्यात येत असल्याने शेतशिवारात पाऊचचा सडा पडलेला आहे. शेतात पांढरे शुभ्र असे चित्र दिसून येत आहे. सायंकाळ होताच गावठी दारु विक्रीचे एजंट गोंदेखारी, सिंदपुरी, मोहाडी (खापा) शेतशिवार गाठत आहे. प्रशासनाच्या कारवाईपासून बचाव करण्यासाठी हा हायटेक प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे. सिहोरा व रुपेरा गावात सायंकाळी यात्राच असल्याचे दिसून येत आहे. या आधी गावठी दारु विक्रेत्यावर प्रशासकीय कारवाई करीता पुढाकार घेण्यात आले आहे. परंतु ही कारवाई दुपारी १२ वाजता राबविण्यात आली आहे. यामुळे यंत्रणेच्या हातात धुपाटणे सापडले आले आहे. गावठी दारु विक्री सायंकाळी ते रात्री उशिरा पर्यंत विक्री करण्यात येत असताना या कालावधीत रेड घालण्यात येत नाही. या कालावधीत तमाशा सुरु असताना कुणी ढुंकूनही पाहत नाही. यामुळे संताप व्यक्त होत आहे.