जलयुक्त शिवाराने शेततळे, बंधारे तुडूंब
By Admin | Updated: July 31, 2016 00:23 IST2016-07-31T00:23:28+5:302016-07-31T00:23:28+5:30
शासनाचे जलयुक्तशिवार अभियान शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरत आहे.

जलयुक्त शिवाराने शेततळे, बंधारे तुडूंब
विहिरींची पातळी वाढली : मोहाडी तालुक्यातील शेतीला संजीवनी, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यांवर फुलले हास्य
भंडारा : शासनाचे जलयुक्तशिवार अभियान शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरत आहे. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत मोहाडी तालुक्यातील पहिल्या टप्प्यात १५ गावांचा समावेश करण्यात आला. या गावात सर्व यंत्रणांनी मिळून शेततळे, सिमेंटनाला बांध, नाला खोलीकरण, मजगी, साठवण तलाव दुरुस्ती, कोल्हापुरी बंधारे दुरुस्ती, बोडी नूतनीकरण व भातखाचरे पुनर्जीवन अशी २४३ कामे पूर्ण झाली आहेत.
जलयुक्त शिवार अभियानात पूर्ण झालेल्या कामात पाणी साठले असून याचा वापर शेतकरी धान पिकासाठी करत आहे. मोहाडी तालुक्यात या मोसमात जलयुक्त शिवारच्या कामात १७०० टिसीएम पाणीसाठा झाला असून याद्वारे १७०० हेक्टर संरक्षित सिंचन होणे अपेक्षित आहे. २०१५-१६ मध्ये करडी, मोहगाव, बोरी, बच्छेरा, उसर्रा, टांगा, देव्हाडा, नरसिंहटोला, फुटाळा, भिकारखेडा, पारडी, पिंपळगाव, कांद्री, शिवनी व खैरलांजी या गावांचा जलयुक्त शिवार अभियानात समावेश आहे. मोहाडी तालुक्यात नालाबांध व शेततळे तुडूंब भरले असून विहिरीच्या पातळीत वाढ झाली आहे. जलयुक्त शिवार अभियानात शेततळे ३१, सिमेंट नालाबांध १९, नाला खोलीकरण ५५, सिमेंट नालाबांध दुरुस्ती १७, मजगी १८ (३५ हेक्टर), साठवण तलाव १३, बोडी नूतनीकरण ७, भातखाचरे पुनर्जीवन ८२ (१२४ हेक्टर) अशी एकूण २४३ कामे पूर्ण झाली आहेत. झालेल्या कामात १७०० टीसीएम पाणी साठले असून या पाण्यावर १७०० हेक्टर संरक्षित सिंचन होणार आहे.
जलयुक्त शिवारामुळे वाहून जाणारे पावसाचे पाणी अडविण्यात आले असून त्याचा वापर सिंचनासाठी होत आहे. धान रोवणीसाठी या पाण्याचा वापर केला आहे. पावसाने सरासरी गाठली नसल्याने शेतकऱ्यांच्या मदतीला जलयुक्त शिवारच्या कामातील साठलेले पाणी धावून येत आाहे. (शहर प्रतिनिधी)
मोहाडी तालुक्यात १०८ गावे असून त्यापैकी १५ गावांचा जलयुक्त शिवार अभियानात समावेश आहे. अडलेल्या पाण्याचा शेतकरी सिंचनासाठी वापर करीत आहेत. बांध व शेततळ्यात साठलेले पाणी धानासाठी संजीवन ठरत आहे. सोबतच विहिरीच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. दुसऱ्या टप्प्यात १० गावांची निवड झाली असून या ठिकाणी कामे सुरु आहेत.
- आर.जे. पात्रीकर
तालुका कृषी अधिकारी, मोहाडी