विद्युत पुरवठ्याअभावी रखडली पाणीपुरवठा योजना
By Admin | Updated: April 10, 2015 00:45 IST2015-04-10T00:45:44+5:302015-04-10T00:45:44+5:30
तालुक्यातील मोरगाव व राजेगाव येथील ग्रामीण पाणीपुरवठा योजना विद्युत जोडणी अभावी रखडली आहे.

विद्युत पुरवठ्याअभावी रखडली पाणीपुरवठा योजना
लाखनी : तालुक्यातील मोरगाव व राजेगाव येथील ग्रामीण पाणीपुरवठा योजना विद्युत जोडणी अभावी रखडली आहे. विद्युत पुरवठा झाल्याशिवाय पाण्याचा पुरवठा करता येणार नसल्याचे मोरगावचे सरपंच नाजूक भैसारे यांनी स्पष्ट केले आहे.
मागील दहा वर्षापासून ५० हजार लिटर क्षमतेच्या टाक्या तयार आहेत. पाणीपुरवठा समितीच्या माध्यमातून पाण्याची टाकी व नळयोजना तयार करण्यात आली.
यासाठी लक्षावधी रुपयाचा निधी खर्च करण्यात आला. परंतु अद्यापपर्यंत मोरगाव व राजेगाव येथील लोकांना टिपूसभरही पाणी मिळाले नाही.
मोरगाव येथे निलागोंदी येथील तलावावरून पाणी आणण्याची व्यवस्था करण्यात आली तर राजेगावला बोरगाव नाल्यावरून पंपहाऊसची व्यवस्था करण्यात आली आहे. नळयोजनेच्या दुरुस्ती व इतर साहित्यासाठी ग्रामीण पाणी पुरवठा योजनाद्वारे पुन्हा निधी उपलब्ध करून दिला आहे. पाणी भरण्यासाठी विद्युत जोडणीची गरज आहे.
लाखनी परिसरात कृषीपंपाकरिता वेगळे फिडर तयार करण्यात आले आहेत. विद्युत विभागाने ग्रामपंचायतला इलेक्ट्रीक वायर लांबविण्यासाठी व खांबासाठी निधीची मागणी करण्यात आली आहे. यात ग्रामपंचायतला दोन ते तीन लक्ष रुपयांचा खर्च आहे.
ग्रामपंचायतच्या स्थानिक फंडात इतका पैसा नसतो. यामुळे ग्रामपंचायत विद्युत वितरण विभागाची मागणी पूर्ण करू शकत नाही. सरपंच नाजूक भैसारे व सरपंच बाळा ठाकरे यांनी नळयोजनेसाठी विद्युत पुरवठा कृषी फिडरवरून करावी अशी मागणी शेतकरी व नागरिकांनी केली आहे.
कृषी पंपांना आठ तास विद्युत पुरवठा केला जातो. आठ तासात पाण्याची टाकी भरणे शक्य असल्याचे स्पष्ट केले आहे.
जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने राजेगाव व मोरगावसाठी १४ लक्ष रुपयाचा निधी नळ दुरुस्ती व साधनसामुग्री खरेदी साठी मंजूर केले आसहे. विद्युत पुरवठ्याचा प्रश्न सुटल्यानंतर राजेगाव व मोरगाव येथील तीन हजार लोकांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटेल. (तालुका प्रतिनिधी)