जांभोऱ्यातील पाणीपुरवठा ठप्प
By Admin | Updated: September 18, 2014 23:30 IST2014-09-18T23:30:39+5:302014-09-18T23:30:39+5:30
जांभोरा पाणी पुरवठा योजना १५ दिवसांपासून बंद आहे. नागरिक शुद्ध पिण्याच्या पाण्यापासून वंचित असताना ग्रामपंचायत पदाधिकारी बाहेरगावी गेले असल्याचे सांगितले जाते. ग्रामविकास अधिकारी इतर

जांभोऱ्यातील पाणीपुरवठा ठप्प
युवराज गोमासे - करडी (पालोरा)
जांभोरा पाणी पुरवठा योजना १५ दिवसांपासून बंद आहे. नागरिक शुद्ध पिण्याच्या पाण्यापासून वंचित असताना ग्रामपंचायत पदाधिकारी बाहेरगावी गेले असल्याचे सांगितले जाते. ग्रामविकास अधिकारी इतर गावांचा प्रभार असल्याचे कारण देत दुर्लक्ष करीत असतात. त्यामुळे पंपहाऊस मधील इंजीनमधील बिघाड दुरुस्तीला विलंब होत असून नागरिक पाण्यासाठी भटकत आहेत. प्रशासनाच्या दुर्लक्षाचा परिणाम नागरिकांना भोगावा लागत आहे.
जांभोरा पाणी पुरवठा योजनेला वैनगंगा नदीवर पंपहाऊस बसविण्यात आला आहे. ७ ते ८ कि.मी. अंतरावरून पाईप लाईनद्वारे गावकऱ्यांना पाण्याचा पुरवठा केला जातो. पंपहाऊसमधील इंजीनमध्ये बिघाड आल्याने सध्या स्थितीत संपूर्ण योजना बंद पडली आहे. पाणीपुरवठा १५ दिवसांपासून ठप्प आहे. मात्र इंजीन दुरुस्तीचे सौजन्य दाखविले नाही. सरपंच कल्पना गोबाडे मुलांचे आरोग्य बिघडल्याने गावाबाहेर आहेत. उपसरपंच ताराचंद समरीत सुद्धा गावात नाहीत. ग्रामपंचायतीचे काही पदाधिकारी बाहेर आहेत. अशावेळी योजना चालविण्याची जबाबदारी ग्रामविकास अधिकारी सानप यांचेकडे येते. मात्र त्यांनी सुद्धा दुर्लक्ष केल्याने नागरिकांना पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. करडी व पांजरा बोरी गावाचा प्रभार सानप यांच्याकडे असून प्रभारी गावातील कामांचा ताण वाढल्याने वेळ मिळत नसल्याचे कारण त्या पुढे करीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. नागरिकांना नियमित शुद्ध पिण्याच्या पुरवठा करण्याची जबाबदारी ग्रामपंचायत प्रशासनाची आहे. प्रशासनामध्ये सरपंच, उपसरपंच, सचिव, सर्व सदस्यांचा समावेश होतो. गावात १५ दिवसापासून पिण्याच् या पाण्यासाठी हाहाकार उडाला असताना तातडीचा निर्णय म्हणून ग्रामविकास अधिकाऱ्यांनी जबाबदारी पार पाडायला हवी होती. मात्र त्यांनी त्यासाठी निर्णय क्षमता दाखविली नाही. परिणामी योजना बंद राहिली असा आरोप आहे.
नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी कराचा भरणा करतात. एखादवेळी कराचा भरणा करण्यास उशीर झाल्यास पाण्याचा पुरवठा खंडीत किंवा बंद करण्याची भाषा वापरली जाते. मग नियमित पिण्याचा पाण्याचा पुरवठा करण्याची जबाबदारी ग्रामपंचायत प्रशासनाची नाही काय? निव्वळ अधिकाराचा दंभ मिरविण्यासाठीच पदाधिकारी आहेत काय? असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे. नागरिकांचे अच्छे दिन येण्यासाठी तातडीने उपाययोजना करून इंजीनमधील बिघाड दुरुस्त करण्यात यावा, पाण्याचा पुरवठा करण्यात यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
योजना १५ दिवसापासून बंद असल्याच्या मुद्यावर सरपंच कल्पना गोबाडे यांना विचारणा केली असता त्या म्हणाल्या मुलांची प्रकृती बिघडल्याने मी गावाबाहेर आहे. गावी आल्यानंतर तातडीने निर्णय घेतला जाईल, मात्र त्या अगदोरच आपण इंजीन दुरुस्तीच्या सूचना दिल्या आहेत. पाणी पुरवठा लवकरच नियमित केला जाईल.