झाडाच्या बुंध्याशी लागले पाणी!
By Admin | Updated: May 12, 2014 23:16 IST2014-05-12T23:16:12+5:302014-05-12T23:16:12+5:30
एकीकडे जिवाची काहिली करणारा उन्हाळा. दुसरीकडे पाणी टंचाई. अशा स्थितीत अंगाची लाहीलाही करीत पिण्याच्या पाण्यासाठी भटकंतीची वेळ असताना साकोली तालुक्यातील

झाडाच्या बुंध्याशी लागले पाणी!
संजय साठवणे - साकोली एकीकडे जिवाची काहिली करणारा उन्हाळा. दुसरीकडे पाणी टंचाई. अशा स्थितीत अंगाची लाहीलाही करीत पिण्याच्या पाण्यासाठी भटकंतीची वेळ असताना साकोली तालुक्यातील आलेबेदर जंगलातील गडबड्या महादेव टेकडीच्या खाली एका झाडाच्या बुंध्याशी अवघ्या एक फुटावर पाणी लागले आहे. मे महिन्याच्या ऊन्हात सुर्य आग ओकत आहे. नाले, तलाव व विहिरी कोरड्या पडलेल्या आहेत. असे असताना जमिनीपासून अवघ्या एक फुट खोल खड्यात पाणी लागणे, ही निसर्गाची लिला म्हणायची की वैज्ञानिक कारणामुळे पाणी येत असावे, हा संशोधनाचा भाग आहे. आलेबेदर जंगलातील तुडमापुरी या गावातील नागरिकांना महादेवाच्या टेकडीखाली तुडमापुरीकडे जाणार्या पायवाटेच्या बाजुला एका झाडाच्या बुंध्याशी असलेल्या एका खड्ड्यात पाणी दिसून आले. हा खड्डा केवळ दीड बाय दीड लांबी रुंदीचा असून एक फूट खोल खड्डा आहे. या खड्डयातील पाणी बघून गावकरी चकीत झाले. महादेवाची आख्यायिका या जंगलातील टेकडीवर भगवान शंकराचे एक छोटेसे मंदिर आहे. दरवर्षी याठिकाणी महाशिवरात्रीला यात्रा भरते. हे मंदिर गडबड्या महादेवाचे मंदिर असे नावारुपाला आहे. नवसाला पावनारा महादेव असल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणने आहे. झर्याविषयी माहिती ज्याठिकाणी हे पाणी लागले, त्याठिकाणाहून एक लहानसा पाणी जाण्याचा मार्ग पाट आहे. या पाटातून पावसाळ्यात पाणी वाहते. मात्र हिवाळा व उन्हाळ्यात हा पाट पुर्णत: कोरडा राहतो. ज्याठिकाणी हे पाणी लागले त्याठिकाणी ४0 ते ५0 वर्षापुर्वी झरा होता. कालांतराने तो झरा आटला. आता बर्याच वर्षानंतर याठिकाणी पाणी लागले आहे. वन्यप्राण्याचे वास्तव्य ज्याठिकाणी हे पाणी लागले त्याठिकाणी वाघ व अस्वल यासारखे वन्यप्राणी राहत आहेत. वन्यप्राण्यांनी पाण्याच्या शोधात खड्डा केला असावा, पूर्वी असलेला झरा पुन्हा सुरू झाला असावा, असेही नागरिकांचे म्हणने आहे. भर उन्हाळ्यात एक फुटावर पाणी लागल्यामुळे या मंदिराला भेट देणार्या भाविकांची संख्या वाढली आहे.