आकाशाकडे नजरा अन् डोळ्यात पाणी
By Admin | Updated: July 17, 2015 00:29 IST2015-07-17T00:29:23+5:302015-07-17T00:29:23+5:30
पावसासाठी आकाशाकडे नजरा लावून बसलेल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यातून पाणी बरसत आहे.

आकाशाकडे नजरा अन् डोळ्यात पाणी
भंडारा : पावसासाठी आकाशाकडे नजरा लावून बसलेल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यातून पाणी बरसत आहे. परंतु आकाशातून पावसाची एकही सर कोसळायला तयार नाही. मागील दोन आठवड्यापासून साधारणपणे २७ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. ज्या पिकांची पेरणी झाली त्या पिकांची पावसाअभावी वाढ खुंटली आहे. २२ जूनपासून पावसाने दीर्घ दडी मारली आहे. त्यामुळे या आठवड्यात पाऊस न बरसल्यास दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे.
जिल्ह्यात यावर्षी पीक लागवडीचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ९८ हजार ६३९ हेक्टर आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला आणि शेवटी समाधानकारक पाऊस झाल्याने केवळ ३२ हजार ५०३ हेक्टरवर खरिपाच्या पेरणी झाली असून रोवणी केवळ ७,१४२ हेक्टरवर झाली आहे. जुलै महिन्यात पावसाने पुन्हा दडी मारल्याने ९६ टक्के क्षेत्रावर खरिपाची पेरणी पूर्ण होऊ शकलेली नाही.
आतापर्यंत १ जून ते १६ जुलैपर्यंत केवळ ३४६.२ मि.मी. पाऊस झाला आहे. या कालावधीत ४२३ मि.मी. पावसाची गरज आहे. हा पाऊस नियमित झाला तर पिकांना लाभदायी ठरतो. मात्र एकाचवेळी पाऊस येणे आणि १५ दिवस उन्ह तापणे यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
यंदा मात्र जिल्ह्यात जूनपासूनच मान्सूनच्या पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर काही दिवस पावसाने दडी मारली होती. ७ जूनपासून पावसाला सुरुवात झाली. ११ ते १७ जूनपर्यंत जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला. ज्यांनी पेरणी केली आहे त्यांचे पऱ्हे पाण्याअभावी सुकू लागले आहेत. काही भागात पेरणी केल्यापासून पाऊस नसल्यामुळे दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. मागील १५ दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्याने सुमारे दीड लाख हेक्टर क्षेत्रावरील पेरणी खोळंबली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. मागील तीन दिवसांपासून उन्ह तापत असल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
गावागावांत पावसाचीच चर्चा
यंदा खरिपातील पेरण्या केल्यानंतर वरूणराजाने तब्बल चार आठवड्यापासून पावसाने लांब दडी मारल्यामुळे गावोगावी केवळ पाऊस कधी येणार याचाच अंदाज घेणाऱ्या गप्पागोष्टी रंगत आहेत. मागील २५ दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. पाण्याअभावी पिके सुकू लागली आहे. ज्यांच्याकडे सिंचनाची सुविधा आहे ते पाणी देऊन पिके जगवित आहेत. मात्र ज्यांच्याकडे ही सुविधा नाही, अशा शेतातील पिके माना टाकू लागले आहेत.
भर पावसाळ्यात उन्हाळ्याचे चटके पारा ३६.५ अंशावर
भंडारा : भर पावसाळ्यात उन्हाळ्यातील उन्हाचे चटके भंडारावासियांना सोसावे लागत आहेत. गुरुवारला ३६.५ डिग्री तापमानाची नोंद झाली असून उन्हाच्या तडाख्याने निर्माण झालेल्या उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. यंदा उन्हाळ्यातील तापमान ४६ अंशापर्यंत गेले होते. साधारणत: ३५ अंशापर्यंत तापमान पोहोचल्यास उन्हाच्या झळा जाणवायला लागतात. जीवाची लाही लाही होणे सुरु होते. उन्हाळ्यात दरवर्षीच असे वातावरण असते. त्यामुळेच लोकांना पावसाळ्याची प्रतीक्षा असते. परंतु यंदा भंडाराकर भर पावसाळ्यातही उन्हाळ्याचा अनुभव घेत आहेत. सुरूवातीला दमदार पावसाने हजेरी लावल्याने नागरिक सुखावले होते. मात्र, १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे वातावरण पुरते पालटले आहे. आठवडाभरापासून ३४ ते ३७ डिग्री तापमानाची नोंद झाली आहे. गुरुवारला ३६.५ अंश तापमान नोंदविण्यात आले आहे. उकाड्यामुळे जनजीवनावर परिणाम झाला असून आरोग्याच्या समस्या उद्भवल्या आहेत.