यंदाही वाया जाणार पावसाचे पाणी
By Admin | Updated: June 15, 2015 00:29 IST2015-06-15T00:29:23+5:302015-06-15T00:29:23+5:30
दिवसेंदिवस घटणाऱ्या पावसाची आकडेवारी आणि वाढणारी जलस्त्रोतांची संख्या पाहता शासनाने भूगर्भातील पाण्याची ...

यंदाही वाया जाणार पावसाचे पाणी
भंडारा : दिवसेंदिवस घटणाऱ्या पावसाची आकडेवारी आणि वाढणारी जलस्त्रोतांची संख्या पाहता शासनाने भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्यभर रेन वॉटर हार्वेस्टिंगला चालना देण्याचे शासनाचे प्रयत्न सुरू आहेत़ परंतु राज्य शासनाच्या सर्व शासकीय यंत्रणांनीच या कार्यक्र माकडे दुर्लक्ष केले आहे़
मागील चार वर्षांपासून पाणी वाचविण्यासाठी धडपड करणाऱ्या जिल्हा प्रशासनाने रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी कोणतीच विशेष मोहीम राबवली नाही. ही सोय न करणाऱ्या इमारतींना बांधकाम पूर्णत्वाचा दाखला न देण्याचे धोरण अवलंबिले होते काय? अन् ज्यांनी हे धोरण अवलंंबिले नाही त्यांच्यावर कोणती कारवाई केली याबद्दल कोणीच बोलत नाही. शिवाय नगर रचना विभागाने बांधकाम पूर्णत्वाचा दाखला देण्यापूर्वी रेन वॉटर हार्वेस्टिंगची सोय केली की नाही, याबाबत खातरजमा करूनच बांधकाम पूर्णत्वाचा दाखला द्यावा, असा नियम आहे. मात्र याकडे भंडारा जिल्ह्यात गांभीर्याने बघितले जात नसल्याचेही आरोप होत आहेत. प्रत्यक्षात भंडारा जिल्ह्यात वेगाने इमारतींचे बांधकाम होत असताना; त्या वेगाने रेन वॉटर हार्वेस्टिंगही व्हायला हवे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
पर्यावरणाकडे दुर्लक्ष नको
भंडारा जिल्ह्यात दर उन्हाळ्यामध्ये मोठ्या पाणीटंचाईला सामोरे जावे लागते़ शहरात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागत आहे़ हे सर्व पर्यावरण संवर्धन व रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या दुर्लक्षाचे परिणाम आहेत़ जिल्ह्यात वाढत्या धांधकामामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरत नसल्याने पाण्याची पातळी खालावत आहे़ प्रत्येक घर व सोसायटीवर रेन वॉटर हार्वेस्टिंग केल्यास मोठ्या प्रमाणावर पाण्याची बचत होऊन टंचाईला आळा बसेल .
आराखड्यात नमूद करणे बंधनकारक
भंडारा शहराला दरवर्षी पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते़ तसेच शहरामधील जमिनीतील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत चालल्याने नगरपालिकेने नवीन घरे बांधणाऱ्या मालक, विकासकांना रेन वॉटर हार्वेस्टिंगची सोय करणे बंधनकारक केले आहे. नव्याने घर बांधताना पावसाचे पाणी वाहून न जाता जमिनीत मुरावे, हा यामागचा उद्देश आहे. नगर रचना विभागाने बांधकाम पूर्णत्वाचा दाखला देण्यापूर्वी रेन वॉटर हार्वेस्टिंगची सोय केली की नाही, याबाबत खातरजमा करूनच बांधकाम पूर्णत्वाचा दाखला द्यावा, असा नियम आहे. शिवाय रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबविणार असल्याचे विकासकाला आराखड्यात नमूद करणे बंधनकारक आहे. परंतु फोटोबाजी करून पळवाट शोधली जात आहे. इमारत उभी केल्यावर तेथे हा प्रकल्प खरोखरच राबविला गेला आहे की नाही, हे तपासण्यासाठी नगर रचना विभागात स्वतंत्र यंत्रणा असणे आवश्यक आहे. (नगर प्रतिनिधी)
रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे काय?
रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे सोप्या भाषेत छतावर पडणारे पावसाचे पाणी अडवून ते एका टाकीमध्ये साठवून ठेवणे आणि गरज भासेल तेव्हा त्या पाण्याचा वापर करणे होय. दरवर्षी दरवेळी पाऊस पडतो, तो ओहळ, ओढे, नद्या, नाले यामध्ये वाहून जातो़ नद्यांवर असलेल्या धरणांच्या क्षमतेनुसार हे पावसाचे पाणी साठवले जाते. साठविलेल्या पाण्याचे नियोजनही के ले जाते. परंतु पाऊस लांबला की साहजिकच हे नियोजनही कोलमडते. मग सुरू होतो पाण्यासाठी संघर्ष. या संघर्षावरचे एकमेव उत्तर म्हणजे वैयक्तिक पातळीवरील रेन वॉटर हार्वेस्टिंग हा असल्याचे जलतज्ज्ञांकडून सांगितले जाते़ यासाठी शासनाने पुढाकार घेतला असून, राज्यभरातील शासकीय कार्यालयांच्या इमारतींवर ही साधी सोपी यंत्रणा बसवून पाणी साठवण करण्यासाठी प्रयत्न करीत आहे़
असे केले जाते हार्वेस्टिंग
पावसाचा पडणारा प्रत्येक थेंब साठवून ठेवण्यासाठी याद्वारे प्रयत्न केले जातात़ त्या अनुषंगाने आपले घर, मग आपण राहत असलेली इमारत, इमारतींची मिळून बनलेली सोसायटी, यांच्या छतावर पडणारे पावसाचे पाणी एकत्र करून ते एका पाईपद्वारे इमारतीशेजारी खोदलेल्या खड्ड्यात अथवा बांधलेल्या टाकीत साठवले जाते व आवश्यकतेनुसार त्याचा सर्व सोसायटींसाठी वापर करता येतो़ याबरोबरच झिरप खड्डा व कूपनलिका पुनर्भरण यासह इतर पद्धतीने हे पाणी जमिनीत मुरवून कूपनलिका व विहिरींची पाणी पातळी वाढविली जाते़
जिल्ह्यात जसजसे घरांचे बांधकाम मोठ्या प्रमाणात होत आहे, त्या प्रमाणात मात्र वॉटर हार्वेस्टिंगचे प्रमाण होत नाही. नव्या बांधकामांना परवानगी देताना पालिका वॉटर हार्वेस्टिंग करण्याची सूचना करते. वॉटर हार्वेस्टिंग करणे हे निर्देश असले तरी प्रत्येकांनी याचे पालन करणे बंधनकारक नाही. जिल्ह्यात वॉटर हार्वेस्टिंगचा प्रयोग शासकीय कार्यालयांपासून प्रारंभ झाल्यास आपोआपच याची अंमलबजावणी प्रत्येक नागरिक करतील.
- रवींद्र देवतळे,
मुख्यधिकारी, नगर परिषद, भंडारा.