वर्धेच्या दप्तरी अ‍ॅग्रोला ७९ हजारांचा दंड

By Admin | Updated: August 3, 2014 23:09 IST2014-08-03T23:09:09+5:302014-08-03T23:09:09+5:30

पांढराबोडी येथील शामराव सार्वे यांनी वर्धेच्या दप्तरी अ‍ॅग्रो प्रा.लि. च्या माध्यमातून कृषी केंद्रात आलेले धानाचे वाण शेतात पेरले. मात्र ते निकृष्ट असल्याने सार्वे यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.

Wardha's Daphthi Agrila was fined 79 thousand rupees | वर्धेच्या दप्तरी अ‍ॅग्रोला ७९ हजारांचा दंड

वर्धेच्या दप्तरी अ‍ॅग्रोला ७९ हजारांचा दंड

ग्राहक मंचचा निर्णय : निकृष्ट बियाणे पुरविल्याचा फटका
भंडारा : पांढराबोडी येथील शामराव सार्वे यांनी वर्धेच्या दप्तरी अ‍ॅग्रो प्रा.लि. च्या माध्यमातून कृषी केंद्रात आलेले धानाचे वाण शेतात पेरले. मात्र ते निकृष्ट असल्याने सार्वे यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. याप्रकरणी त्यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने दप्तरी अ‍ॅग्रोला नुकसान भरपाई पोटी ७९ हजार रुपये देण्याचा दंड ठोठावला आहे.
शामराव सार्वे यांची रहणी येथे गट क्रमांक २७ (१), (२) येथे पाच एकर शेतजमीन आहे. या शेतीत त्यांनी पांढराबोडी येथील प्रकाश कृषी सेवा केंद्रातून दप्तरी श्री १००८ चे २०१२ मध्ये वाण घेतले व ते पाच एकर शेतामध्ये २४.६.२०१२ ला १०० किलो बियाण्यांची पेरणी केली. मात्र त्यानंतर या बियाण्यांपासून कुठलेही रोप आले नाही. याची तक्रार सार्वे यांनी कृषी केंद्र धारकाला व तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीकडे केली. या तक्रारीवरून खंडविकास अधिकारी यांनी घटनास्थळाची पाहणी करून चौकशी अहवाल तयार केला. यात सार्वे यांनी सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे नमूद केले. या नुकसानीला वर्धा जिल्ह्यातील सेलू येथील दप्तरी अ‍ॅग्रो प्रा.लि. जबाबदार असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या नुकसानीचे कृषी अधिकारी माकोडे, बी.आर. कोकोडे, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी चव्हाण, मंडळ कृषी अधिकारी ए.डी. कस्तुरे आदींनी शामराव सार्वे यांच्या शेतात झालेल्या नुकसानीचा अहवाल बनविला. याबाबत सार्वे यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचकडे नुकसान भरपाई मिळावी यासाठी दाद मागितली. मंचचे अतुल आळशी, गीता बडवाईक, हेमंतकुमार कटेरिया यांच्या गणपूर्तीत सर्व कागदपत्रे व नुकसानीच्या संदर्भात कृषी अधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेला अहवाल व साक्षी पुरावे तपासण्यात आले. यात सेलूची दप्तरी अ‍ॅग्रो जबाबदार असल्याचा ठपका ठेवण्यात आला. या नुकसानभरपाईपोटी दप्तरी अ‍ॅग्रोच्या व्यवस्थापकाने शामराव सार्वे यांना ६० हजार रुपये दर साल दर शेकडा ९ टक्के व्याजासह, १० हजार रुपये नुकसान भरपाई, पाच हजार रुपये तक्रारीचा खर्च व ४ हजार रुपये बियाण्याच्या खरेदीच्या बिलाचे असे एकूण ७९ हजार रुपये तीस दिवसाच्या आत देण्याचा आदेश देण्यात आला. तक्रार कर्त्याची बाजू अ‍ॅड.जयेश बोरकर यांनी मांडली. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Wardha's Daphthi Agrila was fined 79 thousand rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.