शेतकऱ्यांची मजुरांसाठी भटकंती
By Admin | Updated: March 27, 2015 00:21 IST2015-03-27T00:17:43+5:302015-03-27T00:21:24+5:30
पवनी तालुका हा चौरास भाग म्हणून सर्वत्र प्रसिद्ध आहे. मात्र दरवर्षी होणारी नापिकी व वाढता खर्च पाहता या भागातील शेतकऱ्यांनी ..

शेतकऱ्यांची मजुरांसाठी भटकंती
पालोरा (चौ.) : पवनी तालुका हा चौरास भाग म्हणून सर्वत्र प्रसिद्ध आहे. मात्र दरवर्षी होणारी नापिकी व वाढता खर्च पाहता या भागातील शेतकऱ्यांनी पारंपारिक शेतीला मागे टाकून सागवन जळीचे पीक घेण्यास सुरुवात केली आहे. यात एक हजार जळीमागे एका मजुराला १५० रुपये मिळत आहेत. एका दिवशी एक मजूर ७ ते ८ हजार जळी काढतो. त्यामागे त्याला ८ ते ९ रुपये मिळत असल्यामुळे ही सागवन जळी मजुरांसाठी वरदान ठरत आहे. मात्र यामुळे शेतकऱ्यांना मजूर मिळणे कठीण झाले आहेत. त्यामुळे मजुरांअभावी शेतकऱ्यांची कामे खोळंबलेली आहेत.
धान्याचे कोठार म्हणून पवनी तालुका प्रसिद्ध आहे. वर्षातून तीन वेळा शेतातून उत्पन्न घेतले जाते. पाण्याचा स्त्रोत जास्त प्रमाणात असल्यामुळे उन्हाळी धान पिकाचे उत्पन्न बऱ्याच प्रमाणात घेतले जाते. मात्र धान पिकाला लागणारी जास्त प्रमाणात मेहनत, वाढता खर्च, पिकाला अल्प भाव मिळत नसल्यामुळे या भागातील शेतकरी त्रस्त झालेला होता. दिवसेंदिवस शेतकऱ्यांवरील कर्जाचा डोंगर वाढत असल्यामुळे शेतकरी त्रस्त झाले होते. अनेक शेतकऱ्यांनी पारंपारिक पिकाला मागे टाकून उसाचे उत्पादन घेणे सुरु केले आहे. मात्र वाढत्या महागाईने मिळणाऱ्या मजुरीने मजुरांना आपल्या कुटुंबांचे पालनपोषण करणे कठीण झाले होते. येथील डॉ.अमन भांडारकर यांनी मागील दहा वर्षापूर्वी आपल्या शेतात सागवन जळीचे पिक घेतले होते. या पिकामुळे खर्च कमी उत्पादन जास्त लक्षात येताच अनेक शेतकऱ्यांनी जळीचे पिक घेणे सुरु केले. आज जवळपास शेकडो एकर शेतीमध्ये सागवन जळीचे उत्पादन घेणे सुरु आहे. यात शेतकऱ्यांसोबतच मजुरांना चांगलाच रोजगार मिळाला आहे. गावातील बऱ्याच प्रमाणातील मजूर वर्ग सागवन जळी खोदण्याच्या कामावर जात आहेत. या कामात मजूरी चांगल्या प्रमाणे मिळत असल्यामुळे मजूर वर्ग शेतकऱ्यांचा शेतात काम करण्यास जायला कंटाळत आहेत. कुटुंबाला काम मिळत असल्यामुळे गावात मजूर मिळणे कठीण झाले आहे. मात्र मजूर वर्गात आनंद पाहायला मिळत आहे. दोन महिन्यात एक कुटुंब २० ते ३० हजार रुपयाचे काम करतो. अल्प मेहनत जास्त पैसे मिळत असल्यामुळे मजुरांनी शेतकऱ्यांकडे पाठ फिरविली आहे. (वार्ताहर)