तेंदूपत्ता मजुरांना विम्याची प्रतीक्षा
By Admin | Updated: April 9, 2016 00:22 IST2016-04-09T00:22:54+5:302016-04-09T00:22:54+5:30
ग्रामीण भागात तेंदू हंगा सुरु होताच मजुरांना तेंदुपत्ता संकलनासाठी जंगलात जीव मुठीत धरुन जावे लागते.

तेंदूपत्ता मजुरांना विम्याची प्रतीक्षा
अड्याळ/पहेला : ग्रामीण भागात तेंदू हंगा सुरु होताच मजुरांना तेंदुपत्ता संकलनासाठी जंगलात जीव मुठीत धरुन जावे लागते. परंतु काही ठिकाणी जंगलातील हिंस्त्र पशूचा मजुरांवर हल्ला झाल्याने काहीना जीव गमवावा लागला आहे. अशावेळी शासनाकडून अल्प प्रमाणात मोबदला मिळतो व त्यांचे कुटूंब उघडयावर पडते. तेव्हा तेंदूपत्ता मजुरांना विमा लागू करण्याची मागणी तेंदुपत्ता संकलन करणाऱ्या मजुरांची मागणी आहे.
वर्षातून २० ते २५ दिवस तेंदूपत्ता संकलनाचा व्यवसाय ग्रामीण भागात चालत असतो. तेंदूपत्ता संकलनाच्या व्यवसायाने शासनाला दरवर्षी कोटयावधी रुपये प्राप्त होतात. अवघ्या काही दिवसातच तेंदुपत्ता संकलनाला सुरुवात होणार आहे. परिसरात तेंदुपत्ता गोळा करण्यासाठी बऱ्याच गावी केन फळी उघडण्यात येते. यामुळे ग्रामीण भागातील मजुरांना चांगलाच रोजगार मिळून नगदी कमाई होते.अल्पकालावधीच्या या कामाकरिता घरातील सर्वच सदस्य गुंतलेले असतात. रखरखत्या उन्हात जिवाची पर्वा न करता उन्हाचे चटके खात एक एक पत्ता तोडून घरी आणतात व पानाचा पुडा बांधून फळीवर पोहचवली जातात. तेव्हा या सर्व बाबीचा विचार करुन तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या मजुरांना विमा लागू करण्याची मागणी आहे. (वार्ताहर)