Wainganga, Chulband, Bawanthadi rivers in danger | वैनगंगा, चुलबंद, बावनथडी नदीचे अस्तित्व धोक्यात

वैनगंगा, चुलबंद, बावनथडी नदीचे अस्तित्व धोक्यात

ठळक मुद्देलिलाव नसताना उपसा : रेती वाहतुकीसाठी नदीची नैसर्गिक संरक्षक भींत थडी पोखरली

भंडारा : रेती तस्करीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या घाटांवर लिलाव नसतानाही बेसुमार उपसा सुरू आहे. मशिनच्या अहोरात्र उत्खनन केले जात असल्याने जिल्ह्यातील वैनगंगा, चुलबंद, सूर, बावनथडी नद्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. अनेक ठिकाणी नदीपात्रात मोठाले खड्डे तयार झाले असून वाहतूक सुलभ व्हावी यासाठी नदीची नैसर्गिक भींत थडी खचविण्याचे प्रकार सुरू आहे. यामुळे पर्यावरणासोबतच नदी तिरावरील गावांना पूराचा धोका निर्माण झाला आहे.
भंडारा जिल्ह्यात पूर्वी ९० पेक्षा अधिक रेतीघाट होते. परंतु गोसे प्रकल्पामुळे घाटांची संख्या कमी झाली. जिल्ह्यातील एकाही रेतीघाटाचा लिलाव १४ महिन्यांपासून झाला नाही. दुसरीकडे वाळूचा बेसुमार उपसा सुरू आहे. शासनाच्या महसुलाला चूना लागत आहे. मोहाडी तालुक्यातील रोहा घाटाची पाहणी केली, तेव्हा ठिकठिकाणी रेती उपसाचे खड्डे आणि तिरावर रेतीचे ढिग दिसून आले. दिवसा ढवळ्या रेती जेसीबीने भरून नेली जात असल्याचे चित्र दिसत होते.

पात्र रूंदावल्याचा फटका
रेतीचा उपसा होत असल्याने चुलबंद, सूर, बावनथडी नदीचे अनेक ठिकाणी पात्र विस्तारले आहे. चांदमारा, आष्टी, धुटेरा यासह गुडेगाव, धानोरी, एनोटा येथे नदीपात्र गावाकडे सरकत असल्याचे दिसत आहे. चुलबंद नदीचीही अशीच अवस्था आहे. वाहतूक सुलभ व्हावी म्हणून तस्कर रस्ता तयार करण्याच्या नादात नदीची थडी फोडून काढतात. त्यामुळे पुराचा धोका वाढत आहे.

दररोज होणारा वाळू उपसा
बावनथडी नदीच्या चांदमारा, आष्टी, धुटेरा, सक्करदरा, वैनगंगा नदीच्या रोहा, बेटाळा, माडगी, ढोरवाडा, निलज, बाम्हणी, उमरवाडा, रेंगेपार यासह गुडेगाव, धानोरी, एनोडा, सिंदपूरी, मांगली आणि चुलबंद नदीच्या गवराळा, नांदेड, धर्मापुरी, इटान, अंतर्गाव घाटांवर मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा होत आहे. पर्यावरणवाद्यांनी अनेकदा आवाज उठविला. परंतु कोणतीही कारवाई झाली नाही.

निसर्गाची अनमोल देणगी लाभलेल्या भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रेती तस्करी होत आहे. तस्करीमुळे नदी पात्राला पर्यायाने पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. शासनाने तात्काळ रेतीघाटांचे लिलाव करण्याची गरज आहे. तेव्हाच यावर पायबंद बसेल.
- मो.सईद शेख, पर्यावरण तज्ज्ञ
अध्यक्ष, ग्रीनहेरिटेज,भंडारा.

Web Title: Wainganga, Chulband, Bawanthadi rivers in danger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.