वैनगंगा होऊ लागली दूषित
By Admin | Updated: May 31, 2014 23:15 IST2014-05-31T23:15:08+5:302014-05-31T23:15:08+5:30
जिल्ह्याची जिवनदायिनी असलेल्या वैनगंगा नदीचे पाणी नागनदीच्या सांडपाण्यामुळे दिवसेंदिवस दूषित होत आहे. त्याचा मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. आता नदीच्या स्वच्छतेसाठी घेणार पुढाकार

वैनगंगा होऊ लागली दूषित
नाना पटोलेंनी केली नदीची पाहणी : नदी स्वच्छतेसाठी घेणार पुढाकार
भंडारा : जिल्ह्याची जिवनदायिनी असलेल्या वैनगंगा नदीचे पाणी नागनदीच्या सांडपाण्यामुळे दिवसेंदिवस दूषित होत आहे. त्याचा मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. आता नदीच्या स्वच्छतेसाठी घेणार पुढाकार घेऊन यासंबंधीचा अहवाल संसदेच्या अधिवेशनात मांडणार असल्याचे खासदार नाना पटोले यांनी सांगितले.
आज शनिवारला खा.पटोले यांनी वैनगंगा नदीची पाहणी केल्यानंतर ते नदीकाठावर पत्रकारांशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले, वैनगंगा नदीच्या काठावर गोसेखुर्द सिंचन प्रकल्प बनविण्यात आला आहे. दूषित पाण्यामुळे आतपर्यंत शुद्ध असलेल्या पाण्याने रंग बदलला आहे. याचा परिणाम भंडारावासियांना लागला आहे.
आरोग्य आणि पाणी पुरवठा विभागाने यासंबंधी राज्य सरकारला पाठविलेल्या अहवालात नागपूरच्या नाग नदीचे दूषित पाणी वैनगंगा नदीत सोडण्यात येत असल्यामुळे पाणी दूषित झाल्याचे म्हटले आहे. तरीसुद्धा राज्य सरकारने ही समस्या गंभीरतेने घेतली नसल्याचा आरोपही त्यांनी केला. नाग नदीसोबतच भंडारा शहरातील सांडपाणीसुद्धा वैनगंगा नदीला येऊन मिळत आहे. गोसेखुर्दमध्ये वैनगंगेचा प्रवाह थांबला आहे. परिणामी दूषित पाणी वाहून जात नाही. परिणामी या दूषित पाण्याच्या उपयोगामुळे नागरिकांना चर्म विकार जडले आहेत. याशिवाय पोटाचे विकार फुफ्फुस आणि श्वसनाचे आजार बळावत आहेत. याला कारण वैनगंगा नदीचे दूषित पाणी असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांना भेटणार
वैनगंगा नदीचे पाणी दूषित होण्यामुळे जिल्ह्यातील जनजीवनावर त्याचा प्रतिकूल परिणाम होत आहे. भविष्यात यापासून मोठा धोका होणार असल्यामुळे सोमवारला मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन हा मुद्दा त्यांच्या लक्षात आणून राज्य सरकारने वैनगंगा नदीच्या शुद्धीकरणासाठी योजना आखावी, अशी विनंती करणार आहे. स्वच्छता व पाणी पुरवठा विभागाचे राज्यमंत्री रणजीत कांबळे हे जिल्ह्याचे पालकमंत्री असल्यामुळे त्यांच्याशी चर्चा करणार आहे. वैनगंगा नदीच्या शुद्धीकरणाला प्राधान्य देऊन संसदेच्या पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा उचलणार असल्याचे खा.पटोले यांनी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)