वैनगंगा झाली ‘प्रदूषणमय’
By Admin | Updated: February 22, 2016 01:00 IST2016-02-22T01:00:29+5:302016-02-22T01:00:29+5:30
जीवनदायीनी वैनगंगा नदी रासायनिक द्रव्य व पदार्थामुळे दूषित झाली असून नदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे.

वैनगंगा झाली ‘प्रदूषणमय’
पर्यटन व धार्मिकस्थळ माडगी येथील प्रकार : वैनगंगा स्वच्छ मिशन राबविण्याची गरज
मोहन भोयर तुमसर
जीवनदायीनी वैनगंगा नदी रासायनिक द्रव्य व पदार्थामुळे दूषित झाली असून नदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. स्वच्छ गंगा अभियान राबविला जात आहे. वैनगंगा प्रदूषणमुक्त केव्हा होईल. मानवी जिवनासह पशूंचे आरोग्य धोक्यात आले आहे.
मध्यप्रदेशातील शिवणी येथे वैनगंगेचा उगम होतो. बावनथडी नदी मध्यप्रदेशातूनच उगम होऊन बपेरा येथे बावनथडीचा संगम वैनगंगेत होते. बावनथडी नदीवर राजीव सागर धरण बांधण्यात आले. वैनगंगा नदीवर मांडगी येथे अदानी वीज समूह व राज्य शासनाचा संयुक्त धापेवाडा सिंचन प्रकल्प किंमत ४५० कोटी बांधण्यात आला. बॅरेजमुळे पाणी अडविण्यात आले. बॅरेजच्या पलीकडे पाण्याचा नदीत ठणठणाट आहे तर बॅरेजच्या अलीकडे अथांग पाणी आहे. नियमानुसार नदीचा प्रवाह बंद करता येत नाही, म्हणून अतिशय बारिक धारेच्या नदीत प्रवाह २४ तास सुरु राहतो, परंतु ही धार नदीत पाहिजे तसा पाणी उपलब्ध करु शकत नाही.
माडगी येथे भगवान नृसिंह व विरसिंहाचे जागृत मंदिर असून तिर्थस्थळ आहे. येथे दररोज शेकडो भावीक भेट देतात.
मृत्यू पश्चात संस्कार म्हणून दररोज येथे पिंडदान कार्यक्रम होतात. मंदिराच्या अगदी पायथ्याशी रासायनिक द्रव्य व पदार्थाचा भला मोठा थर येथे जमला आहे. परिसरातील नदीपात्रात असा थर सर्वत्र दिसतो. नदी पात्रही अस्वच्छ आहे. कागद, प्लॉस्टिक पिशव्यांचा येथे खच पडून आहे. नदीपात्रातून रेती माफीयांच्या आर्शिवादाने रेती गायब झाली आहे. नदी पात्रात वाळू ऐवजी माती दिसत आहे.
अनेक भाविक नदीपात्रात चारचाकी व दूचाकी वाहने घेऊन जातात. स्वच्छतेचा मंत्र सध्या देशात गाजत आहे, परंतु मिनी कन्याकुमारी व मिनी पंढरीकडे शासन, प्रशासन तथा स्वयंसेवी संस्थेचे सुध्दा दुर्लक्ष दिसत आहे. स्थानिक व परिसरातील लोकप्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीपूर्वी (पंचायत समिती, जिल्हा परिषद) गावागावात झाडू घेऊन गाव स्वच्छ करण्यात हिराहिरीने सहभागी होत होते ते सध्या गायब झाले आहेत.
तुमसर तालुक्यातून वैनगंगेच्या सुमारे ६० ते ७० किमीचा प्रवास करते. अनेक ठिकाणी पिण्याचे पाणी येथूनच पूरविले जाते. जलकुंभाच्या विहिरी नदीपात्रात तयार केल्या आहेत. रासायनिक द्रव्य तथा पदार्थ नदी पात्रात मिसळल्याने निश्चितच मानव व पशुंच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. हे रासायनिक द्रव्य व पदार्थ कुठून वाहत आले याची माहिती प्रशासनाने घेण्याची गरज आहे.
भंडारा व गोंदिया जिल्ह्याच्या सीमा येथे आहेत तर माडगी व देव्हाडा घाट तुमसर व मोहाडी तालुक्यात येतो. शेकडो भाविक व पर्यटक येथे भेट देतात. तुमसर - गोंदिया राज्य महामार्गावर हे स्थळ असल्याने अनेक अधिकारी व लोकप्रतिनिधी येथूनच प्रवास करतात, परंतु त्यांचे नदी पात्राकडे दुर्लक्ष होणे गंभीर बाब आहे.
येथे दोन्ही तालुका प्रशासन व लोकप्रतिनिधी व स्वयंसेवी संस्थानी वैनगंगा स्वच्छ मिशन राबविण्याची गरज आहे. भंडारा व गोंदिया जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीचे संवर्धन करण्यासाठी वैनगंगा महोत्सवची रूपरेखा आखली आहे, हे येथे विशेष. त्यामुळे जिल्ह्याची जिवनवाहिनीला स्वच्छ व प्रदूषणमुक्त करण्याची गरज आहे.
नदी पात्रात पाणी वाहण्याची गती अत्यंत कमी असल्याने शेवाळासह इतर वनस्पतीची येथे झपाट्याने वाढ होत आहे. येथील पाण्याच्या संपर्कात जास्त वेळ राहिल्यास अंगाला खाज सुटते. त्यामुळे हे पाणी पिण्यायोग्य असेल काय? असा प्रश्न पडतो. येथील पाण्याचे नमूने घेऊन प्रयोगशाळेत पाठवून नेमके उत्तर शोधता येईल.
परंतु राजकीय इच्छाशक्तीची व अधिकाऱ्यांनी कर्तव्य बजावण्याची मानसिकता तयार करावी लागेल. नेमची येतो पावसाळा या म्हणीप्रमाणे कामं केली तर सर्व प्रश्न नक्कीच अनुत्तरीत राहतील. हेच खरे.