वडेगाववासीयांना मिळतेय शुद्ध पाणी
By Admin | Updated: August 6, 2016 00:28 IST2016-08-06T00:28:47+5:302016-08-06T00:28:47+5:30
मनात सेवा करण्याची ईच्छाशक्ती व कर्तव्यपुर्ण करण्याची जिद्द असली तर कोणतेही काम कठीण नाही.

वडेगाववासीयांना मिळतेय शुद्ध पाणी
ग्रामपंचायतीचा उपक्रम : अभिनव योजनेला प्रारंभ
साकोली : मनात सेवा करण्याची ईच्छाशक्ती व कर्तव्यपुर्ण करण्याची जिद्द असली तर कोणतेही काम कठीण नाही. असाच नाविण्यपूर्ण उपक्रम साकोली तालुक्यातील वडेगाव येथील सरपंच सदस्य व सचिवांनी करुन दाखविला. पाच रुपयात २० लिटर शुध्द पाणी ही अभिनव योजना या ग्रामपंचायतने सुरु केली. साकोली तालुक्यातील हा पहिला उपक्रम आहे.
शासन दरवर्षी कोट्यवधी रूपये शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यासाठी खर्च करते. मात्र नागरिक नळ, विहिर किंवा बोअरवेलचे पाणी पितात. हे पाणी पाहिजे त्या प्रमाणात शुध्द नसते. ग्रामीण भागात शुध्द पाणी पुरवठा करणारे यंत्रे गावोगावी नाहीत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला हानीकारक असे अशुध्द पाणी नागरिकांना प्यावे लागते. दरवर्षी पावसाळ्यापुर्ती प्रत्येक ग्रामपंचायत मार्फत शुध्द पाणी पिण्यासाठी सुचना दिल्या जातात. मात्र ग्रामीण भागातील जनता याकडे दुर्लक्ष करते. त्यामुळे तालुक्यातील वडेगाव (खांबा) ग्रामपंचायतीने पुढाकार घेवून शुध्द पाणी पुरवठा करणारी यंत्रणा कार्यान्वित केली. यासाठी १४ व्या वित्त आयोगांतर्गत निधी उपलब्ध झाला. या योजनेद्वारे गावकऱ्यांना पाच रुपयात २० लिटर व २ रुपयात ५ लिटर आरओचे शुध्द पाणी मिळते. नागरिकांच्या आरोग्यासाठी ही अभिनव योजना लावण्यात आली आहे. शुध्द पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन खंडविकास अधिकारी डॉ.शबाना मोकाशी, विस्तार अधिकारी टेंभरे, सरपंच हेमराज गहाणे, उपसरपंच सुनिता चोपकर, ग्रामपंचायत सदस्य लता सयाम, विद्या राऊत, लाकदास बोंबार्डे, मारोती धुर्वे, ग्रामसेवक प्रदीप चेटुले उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)