भंडारा विधानसभा क्षेत्रात मतदारांचा निरुत्साह
By Admin | Updated: October 15, 2014 23:15 IST2014-10-15T23:15:35+5:302014-10-15T23:15:35+5:30
विधानसभा निवडणुकीत अधिकाधिक मतदान व्हावे यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली होती. मात्र दिवसभरातील हालचालीनंतर मतदारांचा निरुत्साहच जाणवला गेला. उमेदवारांच्या बुथ केंद्रावर

भंडारा विधानसभा क्षेत्रात मतदारांचा निरुत्साह
भंडारा : विधानसभा निवडणुकीत अधिकाधिक मतदान व्हावे यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली होती. मात्र दिवसभरातील हालचालीनंतर मतदारांचा निरुत्साहच जाणवला गेला. उमेदवारांच्या बुथ केंद्रावर उत्साह दिसत असला तरी ज्याप्रमाणे मतदारांची भूमिका मतदानासाठी दिसून यायला हवी होती तसला प्रकार दिसून आला नाही. या क्षेत्रात जवळपास ६५ टक्के मतदान झाल्याची प्राथमिक नोंद मिळाली.
सकाळी ७ वाजता भंडारा विधानसभा क्षेत्रातील भंडारा व पवनी तालुक्यात मतदानाला प्रारंभ झाला. सकाळसत्रात मतदारांचा उत्साह दिसून येईल अशी आशा होती. मात्र तसे झाले नाही. सकाळी ११ वाजतापर्यंत भंडारा विधानसभा क्षेत्रात फक्त १५.३१ टक्के मतदान झाले होते. भंडारा विधानसभा क्षेत्रात तीन लक्ष ४१ हजार १९८ मतदार आहेत. त्यापैकी पुरुष मतदारांची संख्या १ लक्ष ७२ हजार ४८६ तर महिला मतदारांची संख्या १ लक्ष ६७ हजार ५७५ इतकी आहे.
दुपारसत्रातही मतदारांचा हवा तेवढा प्रतिसाद मिळाला नाही. दुपारी १ वाजतापर्यंत भंडारा व पवनी तालुका मिळून फक्त ३२.७७ टक्के मतांची नोंदणी करण्यात आली. ३ वाजतापर्यंत यात काही प्रमाणात आशावाद जाणवला. मतांची टक्केवारी १९ टक्क्यांनी वाढली. ही टक्केवारी ५१.३३ इतकी होती.
उमेदवारांच्या बुथ केंद्रांवर मतदारांची नावे पाहून देणाऱ्यांची तसेच कार्यकर्त्यांची गर्दी दिसून आली. मात्र अपेक्षानुरुप मतदारांची संख्या मतदान केंद्रांवर अल्प होती. दिवसभराच्या हालचालींवर लक्ष घातले असता जवळपास एक तासापर्यंत काही केंद्रावर मतदारांची गर्दी दिसून आली.
जिल्हा प्रशासनाने मोठ्या प्रमाणात मतदार जनजागृती केली असतानाही लोकसभेपेक्षा विधानसभेच्या निवडणुकीत मतदान मोठ्या प्रमाणात होईल अशी आशा व्यक्त केली होती. मात्र हा दावा फोल ठरल्याचे सायंकाळपर्यंत स्पष्ट होत गेले.
पवनी : येथील तालुका प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार तालुक्यात शांततेत मतदान पार पडले. मात्र इथेही मतदारांचा निरुत्साह जाणवला गेला. पावसामुळे व काही ठिकाणी ईव्हीएम मशिनमुळे बिघाड आल्यामुळे मतदानाला उशीर झाला.
अड्याळ : येथील वार्ताहराने दिलेल्या माहितीनुसार अड्याळ परिसरात शांततेत मतदान पार पडले. कुठेही अप्रिय घटना घडल्याची नोंद नाही. पवनी तालुक्यातील अड्याळ परिसर क्षेत्र थोड्या प्रमाणात संवदनशील क्षेत्र म्हणून गृहीत धरले जाते. यामुळे येथे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त दिसून आला. येथेही परिसरात दुपारपर्यंत मतदारांनी मतदान प्रक्रियेत निरुत्साह दाखविला. सायंकाळी मात्र मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी दिसून आली.
जवाहरनगर : येथील वार्ताहराने दिलेल्या माहितीनुसार जवाहरनगर पोलीस ठाण्यांतर्गत ५१ मतदान केंद्रांचा समावेश होता.
कोणत्याही केंद्रात अप्रिय घटना घडली नाही. मतदान शांततेत पार पडले. उमेदवारांच्या बुथ केंद्रावरून कार्यकर्त्यांची गर्दी दिसून आली. मात्र येथेही मतदारांचा निरुत्साहच दिसून आला. पावसामुळे काही काळ व्यत्यय निर्माण झाला होता. एकंदरीत सायंकाळपर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली. (प्रतिनिधी)