स्वयंसेवी संघटनांना मिळणार शिर्डी संस्थानकडून रुग्णवाहिका
By Admin | Updated: March 3, 2017 00:44 IST2017-03-03T00:44:44+5:302017-03-03T00:44:44+5:30
श्री साईबाबा संस्थान शिर्डीच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या साई रूग्णवाहिका योजनेद्वारे पहिल्या टप्प्यात एप्रिल व मे महिन्यात ...

स्वयंसेवी संघटनांना मिळणार शिर्डी संस्थानकडून रुग्णवाहिका
व्यवस्थापन समितीचा निर्णय : तर रुग्णांना मिळणार लाभ
भंडारा : श्री साईबाबा संस्थान शिर्डीच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या साई रूग्णवाहिका योजनेद्वारे पहिल्या टप्प्यात एप्रिल व मे महिन्यात १०० रूग्णवाहिका राज्यातील आदिवासी, दुर्गम व पहाडी भागातील स्वयंसेवी संस्थांना देण्याचा निर्णय व्यवस्थापन समितीने घेतला असून या भागातील स्वयंसेवी संस्थांनी श्री साईबाबा संस्थानकडे आवश्यक कागदपत्रासह अर्ज करावे, असे आवाहन संस्थानचे अध्यक्ष डॉ.सुरेश हावरे यांनी केले आहे.
डॉ. हावरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, विश्वस्त सर्वश्री भाऊसाहेब वाकचौरे, सचिन तांबे, प्रताप भोसले, अॅड.मोहन जयकर, विश्वस्त तथा नगराध्यक्षा योगिता शेळके, कार्यकारी अधिकारी बाजीराव शिंदे आदी उपस्थित होते.
डॉ.हावरे म्हणाले, साई रूग्णवाहिका योजनेव्दारे पहिल्या टप्प्यात एप्रिल व मे महिन्यात १०० रूग्णवाहिका राज्यातील आदिवासी, दुर्गम व पहाडी भागातील स्वयंसेवी संस्थांना देण्याचा निर्णय व्यवस्थापन समितीने घेतला असून या भागातील स्वयंसेवी संस्थांनी या प्रकल्पामध्ये सहभागी होण्यासाठी भरावयाचा अर्ज संस्थानच्या संकेतस्थळावर ०१ मार्च २०१७ पासून उपलब्ध होईल. तसेच स्वयंसेवी संस्थेची मागील ३ वषार्ची वार्षीक उलाढाल किमान ५ लाख रुपये असणे आवश्यक आहे.
रूग्णवाहिकेच्या खरेदी रक्कमेच्या ७५ टक्के रक्कम श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था देणगीदार साईभक्तांच्या देणगीतून उपलब्ध करुन देणार असून उर्वरित २५ टक्के रक्कम स्वयंसेवी संस्थांना संस्थानकडे जमा करावयाचे आहे. रूग्णवाहिकेची नोंदणी स्वयंसेवी संस्थांनी करावी व अर्थसहाय्यामध्ये साईबाबा संस्थान व देणगीदार साईभक्ताचे नावाने ठेवावे. या रूग्णवाहिका साई अॅम्बुलन्स नावाने महाराष्ट्रभर चालतील व त्यांचे संचालन स्वयंसेवी संस्थेमार्फत होईल. आदिवासी, दुर्गम व पहाडी भागातील स्वयंसेवी संस्थांनी आवश्यक कागदपत्रासह संस्थानकडे अर्ज करावा असे आवाहन डॉ. हावरे यांनी केले आहे. (नगर प्रतिनिधी)