विरली जिल्हा परिषद शाळेची आदर्शत्वाकडे वाटचाल
By Admin | Updated: February 15, 2016 00:16 IST2016-02-15T00:16:56+5:302016-02-15T00:16:56+5:30
एकेकाळी आदर्श असलेल्या येथील जिल्हा परिषद आदर्श वरिष्ठ प्राथमिक शाळेने आपले आदर्शपण गमावल्याची टीका गावातील अनेक मान्यवर करीत होते.

विरली जिल्हा परिषद शाळेची आदर्शत्वाकडे वाटचाल
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र : ज्ञानरचनावाद पद्धतीने विद्यार्थ्यांना अध्यापन
हरिश्चंद्र कोरे विरली (बु.)
एकेकाळी आदर्श असलेल्या येथील जिल्हा परिषद आदर्श वरिष्ठ प्राथमिक शाळेने आपले आदर्शपण गमावल्याची टीका गावातील अनेक मान्यवर करीत होते. मात्र या शाळेने प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाचे शासकीय निकष पूर्ण केले. या उपक्रमासाठी शाळेची निवड होताच शाळेने नव्याने कात टाकली असून आदर्शत्वाकडे वाटचाल सुरु केली आहे.
या शाळेत १ ते ७ वर्ग असून २३३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि नैसर्गिकरित्या शिकणारा विद्यार्थीच शंभर टक्के प्रगत होऊ शकतो, हा या उपक्रमाचा मुळ सिध्दांत आहे. या उपक्रमांतर्गत शंभर टक्के प्रगत विद्यार्थी घडविण्यासाठी येथील सर्व शिक्षक कंबर कसून कामाला लागले आहेत. त्यांना शाळेचे मुख्याध्यापक बी.डी. भगत आणि विरली (बु.) केंद्राच्या केंद्रप्रमुख सविता उप्रिकर यांचे मार्गदर्शन तर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बळीराम पवनकर यांचे सहकार्य लाभत आहे. सदर उपक्रमांतर्गत ज्ञानरचनावाद पद्धतीने येथील विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते. यासाठी येथील उपक्रमशील शिक्षक जी.एम. वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्राथमिक वर्गामध्ये ज्ञानरचनावादाचे विविध उपक्रम तयार करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे आमदार बाळा काशीवार यांनी या शाळेला भेट दिलेल्या डिजीटल प्रोजेक्टरचा अध्यापनासाठी मोठा उपयोग होत आहे. या प्रोजेक्टरच्या माध्यमातून अनेक क्लिष्ट विषय विद्यार्थ्यांना सरलपणे शिकविण्यास मदत होत आहे. या शाळेत विद्यार्थी बँकेची स्थापना करण्यात आली आहे. या बँकेचे येथील विवेकानंद अकृषक पतसंस्थेत खाते उघडण्यात आले आहे. या बँकेचा सर्व आर्थिक व्यवहार विद्यार्थ्यांकडेच आहे. गेल्या एक दिड महिन्यातच येथील विद्यार्थ्यांनी २३ हजार रुपयांची बचत केली आहे. त्याचप्रमाणे शाळेतील कोणताही विद्यार्थी शालोपयोगी साहित्यासाठी वेळेवर अडू नये, या उद्देशाने ना नफा ना तोटा या तत्वावर शाळेत शालेय वस्तू भांडार सुरु करण्यात आला आहे. या वस्तू भांडारात नोटबुक, पेन, पेन्सील, चित्रकला वही, पाटी आदी सर्व शालोपयोगी साहित्य उपलब्ध आहेत. येथील विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेने शाळेच्या आभारभिंतीवर अनेक चित्रे रेखाटली असून शाळेच्या भिंती बोलक्या केल्या आहेत. तसेच शालेय परिपाठात विद्यार्थ्यांना रोज नवनवीन उपक्रम दिले जात असून येथील अगदी पहिल्या वर्गाचे विद्यार्थीही या उपक्रमामध्ये हिरीरीने सहभागी होत आहेत. येथील परिपाठामध्ये शब्दांचा डोंगर तयार करणे, कविता करणे, दिलेल्या मुद्यावरून कथा तयार करणे, संवाद लेखन आदी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. लाखांदूर तालुक्यातील सुमारे ४० जि.प. शाळांनी या शाळेच्या उपक्रमांची दखल घेऊन शाळेला भेट दिली. येथे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती जाणून घेऊन शाळेच्या उपक्रमशिलतेची प्रशंसा केली.शाळेत विविध उपक्रम राबविण्यासाठी ए.एस. मस्के, मालती शेंडे, सुशीला ब्राम्हणकर, पी.डब्लू. पारधी, डब्लू.डी. वैद्य, एम.जे. कोचे आदींचेसहकार्य लाभत असल्याचे उपक्रमशील शिक्षक जी.एम. वंजारी यांनी सांगितले.