कोरोना नियमांचे उल्लंघन, आता दुप्पट दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:35 IST2021-04-01T04:35:48+5:302021-04-01T04:35:48+5:30
भंडारा : जिल्ह्यात दररोज कोरोना रुग्णांचा आकडा दुपटीने वाढत असून, नागरिक कोरोना नियमांचे पालन करीत असल्याचे दिसत नाही. आता ...

कोरोना नियमांचे उल्लंघन, आता दुप्पट दंड
भंडारा : जिल्ह्यात दररोज कोरोना रुग्णांचा आकडा दुपटीने वाढत असून, नागरिक कोरोना नियमांचे पालन करीत असल्याचे दिसत नाही. आता अशा प्रकाराला आळा घालण्यासाठी कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना दुप्पट दंड ठोठावला जाणार आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने एक आदेश निर्गमित केला आहे. त्यात मास्कसह गृहविलगीकरणाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी पथक तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
भंडारा जिल्ह्यात गत आठवडाभरापासून कोरोना रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. मात्र, नागरिक सर्व नियम पायदळी तुडवून भटकंती करताना दिसत आहेत. अनेक जण मास्क न लावता शहरात फिरताना दिसतात. तसेच गर्दीच्या ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन केले जात नाही. हा प्रकार लक्षात येताच जिल्हा प्रशासनाने कोरोना प्रतिबंधासाठी यापूर्वी असलेल्या दंडामध्ये तब्बल दुप्पट वाढ केली आहे. पूर्वी मास्क न लावणाऱ्या सर्वांना १०० रुपये दंड ठोठावला जात होता. परंतु आता वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा दंड लावला जाणार आहे. आस्थापना, दुकान, संस्था, प्रतिष्ठानांच्या संचालकांनी मास्क न लावल्याचे आढळल्यास त्यांना ५०० रुपये दंड, आस्थापनेत कार्यरत खासगी कर्मचाऱ्यांना २०० रुपये दंड, हाॅटेल, बार व खाद्यपदार्थ सेवा देणाऱ्या संस्थांमधील कर्मचारी, वेटर यांना २०० रुपये दंड, लाॅन, सभागृह, नाट्यगृह, मंगल कार्यालयात आदींच्या मालक संचालकांना ५०० रुपये, तर कार्यरत कर्मचाऱ्यांना २०० रुपये दंड आकारण्यात येणार आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावलेल्या व्यक्तिंना २०० रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे पहिल्या वेळेस उल्लंघन केल्यास व दंड न भरल्यास संबंधित आस्थापना सात दिवसांसाठी सील करण्याचे निर्देश या आदेशात देण्यात आले आहेत. नागरिकांनी नियमांचे पालन करुन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केले आहे.
बाॅक्स
मंगल कार्यालयांना १० हजार दंड
लाॅन, सभागृह, मंगल कार्यालये, हाॅल या ठिकाणी एकाच वेळी ५० पेक्षा अधिक व्यक्ती आढळून आल्यास आस्थापना मालक - संचालकांना १० हजार रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे. पूर्वी हा दंड पाच हजार रुपये होता. यासोबतच कृषी उत्पन्न बाजार समितीत मास्क न लावणे, सामाजिक अंतर न ठेवणे, सॅनिटायझरची व्यवस्था नसणे, यासाठी बाजार समिती सचिवाला दहा हजार रुपये, दुकानदार व विक्रेत्याला २०० रुपये दंड आकारण्यात येणार आहे. तसेच मिरवणुका, लग्नकार्य, वरात, घरगुती कार्यक्रम या ठिकाणी ५०पेक्षा अधिक व्यक्ती आढळल्यास आयोजकांवर दहा हजार रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे.
बाॅक्स
गृह विलगीकरणाचा भंग केल्यास संस्थात्मक विलगीकरण
कोरोना संसर्ग झाल्यानंतर अनेकजण गृह विलगीकरणात आहेत. मात्र, त्यातील काही जण नियमांचे उल्लंघन करुन भटकंती करीत असल्याचे दिसून येत आहे. अशा संबंधित व्यक्तिंना दहा हजार रुपये दंडासह त्यांची रवानगी संस्थात्मक विलगीकरण केंद्रात करण्यात येईल. त्यानंतरही नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई केली जाणार आहे.