गावकऱ्यांनी दिला धान चोरट्यांना चोप!

By Admin | Updated: January 10, 2015 00:25 IST2015-01-10T00:25:45+5:302015-01-10T00:25:45+5:30

शेतातील धान चोरुन व्यापाऱ्याला विकणाऱ्या दोन धान चोरांना पकडून शेतमालक आणि गावकऱ्यांनी चोपुन काढल्याची घटना ८ जानेवारीला ढोलसर येथे घडली.

The villagers chopped the thieves! | गावकऱ्यांनी दिला धान चोरट्यांना चोप!

गावकऱ्यांनी दिला धान चोरट्यांना चोप!

विरली (बुज) : शेतातील धान चोरुन व्यापाऱ्याला विकणाऱ्या दोन धान चोरांना पकडून शेतमालक आणि गावकऱ्यांनी चोपुन काढल्याची घटना ८ जानेवारीला ढोलसर येथे घडली.
राजनी येथील जगदीश तऱ्हेकर यांच्या धानाची मळणी ७ जानेवारीला सायंकाळपर्यंत आटोपल्यामुळे त्यांनी धानाचे पोते शेतातच ठेवले होते. धानाचे पोते शेतातच असल्याचे हेरुन किशोर पंधरे आणि भोजराज बागडे दोघेही रा. ढोलसर यांनी धानाचे पोते चोरण्याचा बेत आखला.
त्यानुसार ८ जानेवारीला पहाटेच्या सुमारास किशोर पंधरे यांची बैलगाडी घेवून हे दोघेही तऱ्हेकर यांच्या शेतावर पोहचले. त्यांच्या शेतातील ४ पोते बैलगाडीत टाकून त्यांनी सकाळपर्यंत मासळ येथील सुरेश भुते यांच्या धानकाट्यावर पोहचविले.
भुते यांना १४०० रुपये प्रति क्विंटल दराने धान विकून आलेले ३ हजार रुपये आपसात वाटले. एक चोराने धान विकून आलेल्या रकमेत दारु ढोसली तर दुसरा जुगार खेळायला बसला.
शेतमालक तऱ्हेकर सकाळी शेतावर गेले असता त्यांना चुरण्याच्या खळ्यावरील धानाचे चार पोते कमी असल्याचे दिसून आले. त्यांनी बारकाईने निरीक्षण केले असता खळ्यामध्ये एक चप्पल पडली असल्याचे दिसली. त्याचप्रमाणे बैलगाडीच्या चाकोऱ्या आढळल्या. त्यांनी ती चप्पल घेवून बैलगाडीच्या चाकोरीच्या मागोवा घेत मार्गक्रमण करुन मासळ येथील धानकाटा गाठला.
चप्पलने केला चोराचा घात!
धानकाट्यावर तऱ्हेकार यांना बैलगाडी आणि बैल गाडीच्या उभारीला लटकवलेली चप्पल दिसली. त्यांनी खळ्यातून आणलेली चप्पल बैलगाडीवरील चप्पलाचाच जोड असल्याचे निदर्शनास आले. त्यानी बैलगाडी मालकाचा शोध घेवून त्याला धानाच्या पोत्याविषयी विचारपूस केली. किशोर पंधरे यांने प्रारंभी चोरीविषयी नकार दिला.
मात्र तेथेच त्याला बेदम बदडल्यानंतर आपला साथीदार भोजराज बागडेसोबत धान चोरल्याचे मान्य केले. या दोन्ही चोरांना ढोलसर येथे आणून पुन्हा बदडले. शेवटी गावातील काही लोकांनी मध्यस्थी करुन तऱ्हेकर यांचे चोरुन नेलेले धानाचे पोते त्यांच्या घरी पोहचविण्याचे कबुल करवून घेतले. आणि हे चोरीप्रकरण सामोपचाराने गावातच मिटविले. (वार्ताहर)

Web Title: The villagers chopped the thieves!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.