गावकरी तहानलेले; सदनिकेत २४ तास पाणीपुरवठा

By Admin | Updated: April 14, 2015 00:46 IST2015-04-14T00:46:01+5:302015-04-14T00:46:01+5:30

गोबरवाही प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत मॉईल कामगारांच्या सुमारे ४०० सदनिकेत नियमित पाणीपुरवठा केला जातो.

The village thirsty; 24 hours water supply in the house | गावकरी तहानलेले; सदनिकेत २४ तास पाणीपुरवठा

गावकरी तहानलेले; सदनिकेत २४ तास पाणीपुरवठा

मोहन भोयर ल्ल तुमसर
गोबरवाही प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत मॉईल कामगारांच्या सुमारे ४०० सदनिकेत नियमित पाणीपुरवठा केला जातो. परिसरातील चिखला व सीतासावंगी गावातील नागरिकांना मात्र एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. माईल प्रशासनाच्या विश्रामगृह, कार्यालय व तंत्रनिकेतन महाविद्यालयामध्ये दररोज २४ तास पाणी पुरवठा सुरु आहे. आम आदमीकरिता येथे पाणीपुरवठा करणे लक्ष्य असताना मात्र मॉईल प्रशासनाला जिल्हा परिषदेचा पाणीपुरवठा विभाग पाणी देत आहे.
बावनथडी नदीवर गोबरवाही प्रादेशिक पाणीपुरवठा योजना कार्यान्वित असून ३० वर्षापूर्वी ही योजना गोबरवाही चिखला, सितासावंगी, राजापूर व नाकाडोंगरी या गावाकरिता सुरु करण्यात आली होती. चिखला व सितासावंगी गावात मॉईल प्रशासनाचे कार्यालयासह मॉईल कामगारांच्या ४०० सदनिका आहेत.
या सदनिकांना मागील अनेक वर्षापासून नियमित पाणीपुरवठा करणे सुरु आहे. याउलट चिखला व सितासावंगी गावातील सामान्य नागरिकांना एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभाग ३६५ दिवसांसाठी प्रति जोडणी ९०० रुपये घेते. सीतासावंगी गावातील सुमारे ३५ नागरिकांनी नळ जोडणीची मागणी केली आहे. त्यांना अजूनपर्यंत जोडणी करून देण्यात आलेली नाही.
चिखला येथील शेख रहीम यांच्याकडे तीन वर्षापासून नळ जोडणी आहे. त्यांना बीलाची मागणी करण्यात येत आहे. परंतु त्यांच्या घरी पाणीपुरवठा केल्या जात नाही. चिखला व सितासावंगीतील मॉईल प्रशासनाच्या विश्रामगृहात कार्यालयात मात्र २४ तास पाणीपुरवठा सुरु आहे. सितासावंगी येथे स्वामी विवेकानंद तंत्रशिक्षण महाविद्यालयाला मुख्य जलवाहिनीतून २४ तास पाणीपुरवठा केला जातो.
सितासावंगी व चिखला येथे नियमित पाणीपुरवठा होत नसतांनी पुन्हा सुंदरटोला गावाला ही पाणीपुरवठा योजना जोडली गेली आहे. सितासावंगी येथील दिलीप देशमुख यांच्या घरी नळाच्यापाण्यात सापसदृष्य प्राणी आल्याने दोन दिवसापूर्वी एकच खळबळ माजली होती. दोन वर्षापूर्वी रमेश अग्रवाल यांच्याघरी पाईप लाईनमध्ये धामन जातीचा साप अडकून मृत्यूमुखी पडला होता. त्यांच्याकडे पाणीपुरवठा बंद झाल्यावर जलवाहिनी दुरुस्ती करताना त्यांचे अवशेष दिसले होते. १५ ते २० वर्षांपासून चिखला व सितासावंगी येथील कामगारांच्या सदनिकेत पाणीपुरवठा करणे सुरु आहे. मॉईल प्रशासन येथे पाणीपुरवठा विभागाला वार्षिक चार लाख रुपये आकारणी देत असल्याची माहिती आहे.
मॉईल प्रशासनाने स्वत:ची पाणीपुरवठा योजना सुरु केली आहे. चिखला येथे त्यांनी कुपनलिका तयार केली आहे. प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेतून पाणी मिळणे बंद झाले तेव्हा मॉईल प्रशासन या कुपनलिकेचा उपयोग करतात. चिखला येथे मॉईल प्रशासनाच्या सदनिकेजवळ पाणी पुरवठा विभागाने एक कार्यालयाची इमारत तयार केली होती. ती आमच्या हद्दीत येते, म्हणून मॉईल प्रशासनाने तोडली. जिल्हा परिषदेचा येथे सुमारे १० लाखाचा नुकसान झाले. नियमानुसार मॉईल प्रशासनाला तात्पुरती पाणीपुरवठा करता येते परंतु मागील अनेक वर्षापासून केंद्र शासनाच्या सदनिकेत जिल्हा परिषद सामान्य नागरिकांना पाण्यापासून वंचित ठेऊन पाणीपुरवठा करीत आहे. या सर्व प्रकाराची चौकशी होणे गरजेचे आहे. (तालुका प्रतिनिधी)

ग्रामस्थांचे पाणी पळविण्याचा प्रकार
४ मॉईल प्रशासनाने स्वत:ची पाणीपुरवठा योजना सुरु केली आहे. चिखला येथे त्यांनी कूपनलिका तयार केली आहे. प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेतून पाणी मिळणे बंद झाले तेव्हा मॉईल प्रशासन या कुपनलिकेचा उपयोग करतात. मॉईल प्रशासनाला पाणीपुरवठा न करुन सामान्य नागरिकांना तो कसा नियमित करता येईल यासंदर्भात विचारले असता, अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. सामान्य नागरिकांना २४ तास पाणीपुरवठा करण्याचा अधिकार नाही का? असा सवालही नागरिक विचारत आहेत. चिखला सरपंच संगीता सोनवाने, उपसरपंच दिलीप सोनवाने, सीतासावंगी सरपंच दमला कठोने, उपसरपंच वामन गाढवे, रामचंद्र मोरे यांनी चौकशी करण्याची मागणी केली आहे.

एक दिवसाआड पाणी पुरवठा करणे हा नियोजनाचा भाग असून सध्या नवीन पाईप लाईन टाकणे सुरु आहे. पूर्वीपासून सदनिकेत पाणी पुरवठा करणे सुरु आहे. भारतीय नागरिकांना तो अधिकार आहे. नियमानुसार कामे सुरु आहेत. जिल्हा परिषद प्रशासनाला या पाणी पुरवठा प्रकरणाची माहिती आहे.
- धनंजय बावनकर,
उपविभागीय अभियंता,
जि.प. पाणीपुरवठा विभाग, तुमसर

Web Title: The village thirsty; 24 hours water supply in the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.