अंधांना दृष्टी दान करणारे गाव विरली
By Admin | Updated: October 15, 2015 00:49 IST2015-10-15T00:49:00+5:302015-10-15T00:49:00+5:30
अंध व्यक्तींच्या जीवनात दृष्टीचा प्रकाश देण्यासाठी नेत्रदान ही एक चळवळ व्हावी यासाठी येथील ग्रामायण प्रतिष्ठान कार्यकरीत आहे

अंधांना दृष्टी दान करणारे गाव विरली
जागतिक अंध दिन आज : ग्रामायण प्रतिष्ठानतर्फे ६५ व्यक्तींचे नेत्रदान
हरिश्चंद्र कोरे विरली (बु.)
अंध व्यक्तींच्या जीवनात दृष्टीचा प्रकाश देण्यासाठी नेत्रदान ही एक चळवळ व्हावी यासाठी येथील ग्रामायण प्रतिष्ठान कार्यकरीत आहे. या प्रतिष्ठानमार्फत आजपर्यंत एकूण ६५ व्यक्तींनी मरणोत्तर नेत्रदान करून या कार्यासक्रियतेने सहभाग दिलेला आहे. यात ६ वर्षाच्या बालीकेपासून ९० वर्षांच्या वृद्धापर्यंतच्या व्यक्तींनी नेत्रदान करून अंधत्व निवारणाच्या राष्ट्रीय कार्यात मोलाचा वाटा उचलला आहे.
ग्रामायण प्रतिष्ठान ही संस्था २००४ पासून विरली येथे कार्यरत आहे. सेंद्रिय शेती, पारंपरिक बियाणे संवर्धन, मृदा आणि जलसंवर्धन यासोबतच रक्तदान, नेत्रदान, देहदान या चळवळी समाजात रूजविण्यात कार्यरत आहे. संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे ३५० व्यक्तींनी नेत्रदानाचा संकल्प केला असून ६५ व्यक्तींनी नेत्रदान केले आहे. सुमारे ५०० व्यक्तींनी रक्तदान केले असून २५० स्वयंसेवी त्यांची चमू आहे. त्याचप्रमाणे देहदान करण्याचा संकल्प केलेला आहे.
३० व्या राष्ट्रीय नेत्रदान पंधरवाड्यानिमित्ताने पदमश्री डॉ. विकास महात्मे यांनी संस्थेच्या नेत्रपेढी नागपूरच्या डॉ. रेखा खंडेलवाल, एन.के.पी. साळवे वैद्यकीय संस्था नागपूरचे अधिष्ठाता डॉ. विकास मित्रा, डॉ. सुनिता महात्मे, विद्या शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रणजित देशमुख हे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी ६ वर्षाच्या मुलीचे नेत्रदान करणारी आई वैशाली सुरेश भेंडारकर यांचा मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
नेत्रदानप्रसंगीचे भावूक क्षण
अर्चना दादा चुटे (२२) हिच्या मृत्यूनंतर नेत्रतज्ज्ञांची चमू येण्यास वेळ लागल्यामुळे शेवटी तिचा मृतदेह सरणावर ठेवल्यानंतर स्मशानभूमीत नेत्रदान करण्यात आले.
१९ वर्षीय मनीषा जागेश्वर भेंडारकर हिचा अपघात झाला. उपचारादरम्यान तिचे निधन झाले. मात्र तिच्या मातापित्यांनी या दु:खद क्षणीही तिचे नेत्रदान केले.
दुसऱ्या वर्गात शिकणाऱ्या सहा वर्षांच्या खुशबूचे हृदयविकाराने निधन झाले. तिच्या आईवडिलांनी काळजावर दगड ठेवून मुलीचे नेत्रदान केले.