लोकसहभागातून ग्राम विकास आराखडा तयार व्हावा
By Admin | Updated: June 8, 2016 00:30 IST2016-06-08T00:30:11+5:302016-06-08T00:30:11+5:30
आमचं गाव, आमचा विकास आणि गावांचा विकास, आपला विकास हे ब्रीद घेऊन अंमलबजावणी होत असलेल्या ...

लोकसहभागातून ग्राम विकास आराखडा तयार व्हावा
राजेंद्र निंबाळकर यांचे आवाहन : ‘आमचं गाव, आमचा विकास’ उपक्रमातंर्गत जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा
भंडारा : आमचं गाव, आमचा विकास आणि गावांचा विकास, आपला विकास हे ब्रीद घेऊन अंमलबजावणी होत असलेल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून ग्रामपंचायत स्तरावर पुढील पंचवार्षिक व वार्षिक कृती आराखडा तयार करण्याची प्रक्रीया सुरु होत आहे. हा आराखडा नागरिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी यांच्या सहभागाने व मार्गदर्शनाने तयार व्हावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांनी केले.
आमचं गाव, आमचा विकास या उपक्रमाअंतर्गत आयोजित जिल्हा परिषद सदस्यांच्या कार्यशाळेप्रसंगी ते बोलत होते. कार्यशाळेला जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर, सभापती नरेश डहारे, सभापती नीळकंठ टेकाम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) सुधाकर आडे, मार्गदर्शक झलके, मास्टरट्रेनर कुंदावार उपस्थित होते.
यावेळी निंबाळकर म्हणाले, ग्रामपंचायत विकास आराखडा हा महत्त्वाचा कार्यक्रम असून पुढील पाच वर्षापर्यंत १४ व्या वित्त आयोगामधून निधी लोकसंख्येच्या आधारे प्रति माणसी २५४ रूपये मिळणार आहे. दीड लाखापासून ते २० लाख रुपयापर्यंत शाश्वत स्वरूपात निधी मिळणार असून हा निधी मानव विकास निर्देशांकाला गृहीत पाणी व स्वच्छतेसारख्या अन्य महत्वाच्या योजनांवर खर्च करावयाचा आहे. याकरिता जिल्हा परिषद, पंचायत समिती व स्थानिक पातळीवरील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिका?्यांनी पुढाकार घ्यावा. ग्रामपंचायत विकास आराखडयात जास्तीत जास्त लोकांचा सहभाग घेवून मार्गदर्शकांची भूमिका पदाधिकाऱ्यांनी पार पाडावी, असे आवाहन करीत १५ आॅगस्टपर्यंत पंचवार्षिक व वार्षिक कृती आराखडा सादर करण्याच्या सूचना दिले आहेत.
जगन्नाथ भोर यांनी जनतेमधून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना लोकांच्या अपेक्षांची चांगली माहिती असते. त्यांचा सहभाग ग्रामविकास आराखडा तयार करताना लाभला तर विकास कामे होऊन सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावल्याशिवाय राहणार नाही. आराखडा तयार करताना स्थानिक जीवनमान उंचावणाऱ्या कामांचा सहभाग आराखडयात तयार करावा.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर आडे यांनी आमचं गाव, आमचा विकास या उपक्रमाअंतर्गत लोकसहभाग नियोजन प्रक्रीया ग्रामपंचायत विकास आराखडयाबाबत माहिती दिली. प्रविण प्रशिक्षक झलके यांनी निधीची उपलब्धता, ग्रामपंचायतचे स्व: उत्पन्न, ग्रामनिधी, रोहयो, स्वच्छ भारत अभियान, जिल्हा नियोजन समिती, लोकसहभाग व स्थानिक खाजगी कंपन्यांकडून मिळणारा निधी, सर्व शिक्षा अभियान, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम, इंदिरा आवास योजना यांच्यासह विविध योजनांचा खर्च करावयाचा निधी याबाबत माहिती दिली. मास्टर ट्रेनर कुंदावार यांनी पंचायत राज व्यवस्था व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचाऱ्यांची भूमिका याबाबत माहिती दिली. कार्यशाळेला जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमासाठी राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियान, शैलेश भांडारकर, चंद्रकिरण तिडके, अर्पणा कुर्झेकर यांनी सहकार्य केले.
(शहर प्रतिनिधी)