वैनगंगा शुद्धीकरणासाठी सरसावली विदर्भ राज्य आंदोलन समिती
By Admin | Updated: May 16, 2016 00:29 IST2016-05-16T00:29:38+5:302016-05-16T00:29:38+5:30
जिल्ह्यातील जीवनदायिनी वैनगंगा नदी दूषित झाली आहे. नाग नदीचे पाणी तसेच इकॉर्निया वनस्पतीमुळे आरोग्य धोक्यात आले आहे.

वैनगंगा शुद्धीकरणासाठी सरसावली विदर्भ राज्य आंदोलन समिती
मुख्य अभियंत्यांना निवेदन : शहरवासी पिताहेत दूषित पाणी
भंडारा : जिल्ह्यातील जीवनदायिनी वैनगंगा नदी दूषित झाली आहे. नाग नदीचे पाणी तसेच इकॉर्निया वनस्पतीमुळे आरोग्य धोक्यात आले आहे. वैनगंगा नदीच्या शुद्धीकरणासाठी आता विदर्भ राज्य आंदोलन समितीनेही पुढाकार घेतला आहे. या संदर्भात मुख्य अभियंता (गोसेखुर्द) यांना समितीच्या वतीने मागण्यांचे निवेदन देण्यात आले. वैनगंगा नदीत नागनदीतील रासायनिक पाण्यामुळे प्रदूषित झाली आहे. तसेच नदीपात्रात इकॉर्निया वनस्पती मोठ्या प्रमाणात पसरलेली आहे. हेच पाणी नगरपालिका प्रशासनाकरवी भंडारेकरांना पिण्यासाठी उपलब्ध केले जाते. परिणामी शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येवून महामारी पसरण्याची चिन्हे आहेत. वैनगंगा नदीचे दूषित पाणी नगरपालिका भंडाऱ्याला जलसंपदा विभाग विक्री करते. या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष वेधण्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समिती भंडारा तर्फे माजी आमदार आनंदराव वंजारी, मधुकर कुकडे, जिल्हाध्यक्ष अॅड.प्रभाकर टेंभुर्णीकर यांनी मुख्य अभियंत्यांशी चर्चा करून मागणीचे निवेदन दिले. या प्रश्नावर तातडीने उपाययोजना करून वैनगंगा नदीचे पाणी दूषित होणार नाही अशी मागणी केली. यावेळी अॅड.टेंभुर्णीकर यांनी वैनगंगा नदीचे पाणी प्रदूषित होण्यास कारणीभूत असणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. यावर मुख्य अभियंता सुर्वे यांनी नदीपात्रातील इकॉर्निया वनस्पती नष्ट करण्याचे आश्वासन दिले. मुरा नदीवर झिरप पद्धतीने पाणी शुद्ध करण्याचा प्रयोग नागनदीतही करण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले.
यासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. यावेळी तुषार हट्टेवार, अर्जुन सूर्यवंशी, केशव हुड, दामोधर क्षीरसागर, जाधवराव साठवणे, गोविंदराव चरडे, प्रमोद मानापुरे, प्रेमलाल लांजेवार, जब्बार खान व इतर उपस्थित होते. (प्रतिनिधी)