इंधन खर्चात उपाध्यक्ष, वाहन दुरूस्तीत सभापतीची आघाडी

By Admin | Updated: November 4, 2015 00:31 IST2015-11-04T00:31:05+5:302015-11-04T00:31:05+5:30

मागील पाच वर्ष जिल्हा परिषदेत सत्ताधारी असलेल्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समितीच्या सभापतींवर जिल्हा निधीतून जिल्हा परिषदेने लाखोंचा खर्च केला.

Vice President of Fuel Cost, Vehicle Repair Chairperson's Leadership | इंधन खर्चात उपाध्यक्ष, वाहन दुरूस्तीत सभापतीची आघाडी

इंधन खर्चात उपाध्यक्ष, वाहन दुरूस्तीत सभापतीची आघाडी

जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांच्या खर्चाचा लेखाजोखा : तत्कालीन पदाधिकाऱ्यांच्या दौऱ्यावर लाखोंचा खर्च
लोकमत विशेष

प्रशांत देसाई  भंडारा
मागील पाच वर्ष जिल्हा परिषदेत सत्ताधारी असलेल्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समितीच्या सभापतींवर जिल्हा निधीतून जिल्हा परिषदेने लाखोंचा खर्च केला. त्यात मानधन, वाहन, घरभाडे व प्रवास भत्ता व अन्य खर्चाचा समावेश आहे. मागीलवर्षी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रमेश पारधी यांनी वाहनाच्या इंधन खर्चावर ३.२६ लाख तर माजी कृषी सभापती संदीप टाले यांनी वाहन दुरूस्तीवर ५० हजार रुपये खर्च केले. उपाध्यक्ष व कृषी सभापती दोघांनीही खर्च करण्यात आघाडी घेतल्याचे खर्च विवरणावरून दिसून आले आहे.
जिल्हा परिषदेत मागील पाच वर्षात भाजपची सत्ता होती. सन २०१० ते २०१५ चा पदाधिकाऱ्यांच्या खर्चाचा तपसील जाणून घेतला असता त्यात पदाधिकाऱ्यांवर लाखोंचा खर्च करण्यात आल्याचे दिसून आले आहे. जिल्हा परिषद अध्यक्षांना एका वर्षासाठी इंधन खर्चासाठी सहा हजार लिटरची मर्यादा आहे.
उपाध्यक्ष व विषय समितीच्या सभापतींना चार हजार लिटर इंधन खर्चाची मर्यादा आहे. त्यात मागीलवर्षी सन २०१४-१५ या एका वर्षात जिल्हा परिषद उपाध्यक्ष रमेश पारधी यांनी इंधनावर सर्वाधिक ३ लाख २५ हजार ९६९ हजार रूपये खर्च केले. वाहन दुरूस्तीच्या खर्चाची मर्यादा ५० हजारांची असल्याने कृषी सभापती संदीप टाले यांनी त्याचा पुरेपूर लाभ उचलून ५० हजार खर्च केले.
इंधनावर खर्च करणाऱ्यांमध्ये उपाध्यक्षानंतर महिला व बालकल्याण समिती सभापती रेखा भुसारी दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांनी २ लाख १४ हजार ७९३ रूपये खर्च केले. कृषी सभापती संदीप टाले यांनी २ लाख १३ हजार १५ रूपये खर्च करून तिसऱ्या क्रमांकावर असल्याने त्यांनी अन्यांच्या तुलनेत ते मागे नसल्याचे दाखवून दिले. इंधन खर्चावर समाजकल्याण सभापती अरविंद भालाधरे यांनी १ लाख ९९ हजार ३८९ रूपये, अध्यक्ष वंदना वंजारी यांनी १ लाख ७५ हजार १७३ रूपये तर सर्वात कमी अर्थ व आरोग्य समिती सभापती संजय गाढवे यांनी १ लाख ५९ हजार ७७० रूपयांचा खर्च केला आहे.
वाहन दुरूस्तीवर खर्च करणाऱ्यांमध्ये कृषी सभापती संदीप टाले आघाडीवर आहेत. त्यांनी मागील वर्षी शासनाकडून मिळणारा ५० हजारांचा सर्व खर्च वाहनावर केला असून असे करणारे ते पहिले सभापती ठरले आहे. त्यांच्यानंतर समाजकल्याण सभापती अरविंद भालाधरे यांनी खर्च केला असून त्यांचा खर्च ४८ हजार ३१ रूपयांचा आहे. त्यांनतर उपाध्यक्ष रमेश पारधी यांनी ३९ हजार ५२४ रूपये, अर्थ व आरोग्य समिती सभापती संजय गाढवे यांनी ३३ हजार २३१ रूपये, महिला व बालकल्याण समिती सभापती रेखा भुसारी यांनी ३३ हजार ३१२ रूपये तर सर्वात कमी वाहनावर खर्च अध्यक्ष वंदना वंजारी यांनी केला असून त्यांचा खर्च २७ हजार ३१५ रूपयांचा झालेला आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष व चार सभापती यांनी मागीलवर्षी इंधनावर १२ लाख ८८ हजार १०९ रूपये तर वाहनावर २ लाख ३१ हजार ४१३ रूपयांचा खर्च उचल केल्याचे दिसून येत आहे.
प्रवास खर्चाची नोंद नाही
पाच वर्षाच्या कार्यकाळात पहिल्या अडीच वर्षात कृषी पशुसंवर्धन समिती सभापतींचा कार्यकाळ २०१० ते १३ पर्यंत होता. त्यानंतरच्या पुढील वर्षात कृषी सभापतीपद व्यक्ती विशेषानुसार बदलले.
अर्थ व बांधकाम समिती सभापतीकडे सदर पद देण्यात आले. या पाच वर्षातील या विभागाच्या सभापतीला प्रवास खर्चापोटी देण्यात आलेल्या खर्चाची नोंद जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागात नसल्याची बाब समोर आली आहे.

पदाधिकाऱ्यांना मिळाले लाखोंचे मानधन
जिल्हा परिषद अध्यक्षांना प्रती महिना २० हजार रूपये, उपाध्यक्षांना १५ हजार, सभापतींना १२ हजार रूपये मानधन मिळते. या मानधन व प्रवास खर्चात सन २०११-१२ मध्ये वाढ करण्यात आलेली आहे. अध्यक्षांना सन २०१० ते २०१५ पर्यंत जिल्हा परिषदने मानधनापाटी ७ लाख २० हजार, उपाध्यक्षांना ५ लाख ४८ हजार, तर अन्य विषय समिती सभापतींना चार लाख ६२ हजार ५८० रूपये देण्यात आलेले आहे.

प्रवास खर्चात अध्यक्षांनी मारली बाजी
अडीच-अडीच वर्षांचा कार्यकाळ उपभोगणाऱ्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापतींना प्रवास खर्च देय असतो. यात पाच वर्षाच्या कार्यकाळातील दोन्ही अध्यक्षांनी मिळून सर्वाधीक प्रवास खर्च उचलला आहे. त्यांनी २ लाख ५२ हजार ३६८ रूपयांची उचल केली आहे. तर उपाध्यक्षांचा प्रवास खर्च १ लाख २७ हजार ४३२ रूपये, समाजकल्याण सभापतींचा खर्च १ लाख १० हजार १८५ रूपये, महिला व बालकल्याण समिती सभापती यांनी १ लाख १ हजार ३७८ रूपये तर सर्वात कमी प्रवास खर्च कृषी व पशु संवर्धन सभापतींनी केला आहे. त्यांचा पाच वर्षातील खर्च ९३ हजार ४४७ रूपयांचा झाल्याची नोंद आहे.

घरभाडे भत्त्यात बांधकाम सभापती समोर
जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवासासाठी बंगला आहे. मात्र, पदाधिकाऱ्यांसाठी जिल्हा परिषदेचे स्वत:चे निवास व्यवस्था नाही. त्यामुळे या पदाधिकाऱ्यांना घरभाडे देण्यात येते. यात सन २०१२-१३ पासून सर्वाधिक घरभाडे भत्याची उचल करणाऱ्यामध्ये सर्वात आघाडीवर अर्थ व बांधकाम समिती सभापती आहेत. त्यांनी तीन वर्षात २ लाख ४ हजार ३०० रूपये, उपाध्यक्षांनी १ लाख ८४ हजार ८१५ रूपये, महिला व बालकल्याण सभापतींनी १ लाख ७३ हजार २९० रूपये, समाजकल्याण सभापतींनी १ लाख ६० हजार ८०३ रूपये तर कृषी व पशु संवर्धन सभापती यांनी १ लाख ५९ हजार २९ रूपयांची उचल केली आहे.

Web Title: Vice President of Fuel Cost, Vehicle Repair Chairperson's Leadership

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.