पशुवैद्यकीय डॉक्टरांचा गोरखधंदा
By Admin | Updated: January 18, 2015 22:40 IST2015-01-18T22:40:57+5:302015-01-18T22:40:57+5:30
पवनी तालुक्यातील कोंढा परिसरात बोगस पशुवैद्यकीय डॉक्टरचा सुळसुळाट वाढला असून हे डॉक्टर पशुपालकांना लुबाडीत आहेत. तालुक्यात १५ च्या जवळपास बोगस पशुवैद्यकीय डॉक्टर कार्यरत आहेत.

पशुवैद्यकीय डॉक्टरांचा गोरखधंदा
कोंढा/कोसरा : पवनी तालुक्यातील कोंढा परिसरात बोगस पशुवैद्यकीय डॉक्टरचा सुळसुळाट वाढला असून हे डॉक्टर पशुपालकांना लुबाडीत आहेत. तालुक्यात १५ च्या जवळपास बोगस पशुवैद्यकीय डॉक्टर कार्यरत आहेत. पण याकडे पशुवैद्यकीय विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
कोंढा येथे बुधवारला म्हैस, गाय बाजार भरतो. येथे दूरवरून नागरिक पशुधनाच्या खरेदी-विक्री करण्यासाठी येत असतात. त्यामुळे कोंढा परिसरात व तालुक्यात पशुपालन व्यवसाय जोडधंदा म्हणून अनेक शेतकरी करीत आहे. कोंढा परिसरातील कोंढा, कोसरा, आकोट, सोमनाळा, विरली खंदाळ, मोखारा, पालोरा चौ., चिचाळ, भावड, सेंद्री खु., सेंद्री बु., या गावात घरोघरी गाय, म्हैस दूध उत्पादन करण्यासाठी पालनपोषण केले जाते. परिसरात गाय, म्हैस यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने परिसरात अनेक पदविका पास नापास झालेले लोक तसेच बोगस पशुवैद्यकीय पदविका मिळविलेले लोक जनावरांची तपासणी करतात. तसेच आजारी गाय, म्हैस, बैल, शेळी व इतर पशुवर उपचार करून मनमानी फी उकळतात. बोगस डॉक्टरच्या उपचाराने अनेक ठिकाणी जनावरे दगावली आहेत. पण पशुसंवर्धन विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्या घरी कृत्रिम रेतनची सोय उपलब्ध होण्यासाठी एक चांगला हेतू ठेवून गावातील दुग्ध पदविका मिळविलेल्या बेरोजगारांना काम मिळावे म्हणून कृत्रिम रेतनचे काम काही तरूणांना दिले. हे बेरोजगार कृत्रिम रेतनाच्या कामासोबत आजारी जनावरांवर उपचार करून मनमानी फी शेतकऱ्याकडून वसूल करतात. जनतेला पशुवैद्यकीय डॉक्टर आहे, असे सांगून जनतेची दिशाभूल करीत आहेत. बोगस डॉक्टरचा गोरखधंदा सध्या पवनी तालुक्यातील इतर गावातही सुरू आहे.
याबाबत भेंडाळा येथे एका गाईचे वासरू काढताना गाईचा मृत्यू झाला यास बोगस डॉक्टर कारणीभूत होता, यासंबंधात पंचायत समिती पवनी येथे त्याची तक्रार झाली. पण त्या बोगस डॉक्टरवर कारवाई झाली नाही. सध्या बोगस डॉक्टरनी जनावराच्या औषधी पुरवठा करण्याचे काम हाती घेतले असल्याची माहिती मिळाली आहे. कोंढा परिसरात घरोघरी पशुधन वाढत असताना जोडधंदा म्हणून पशुचे पालनपोषण करून दुध काढणे सुरू आहे.
पण बोगस डॉक्टरांनी जनावरांवर थातूरमातूर उपचार करून पैसे उकळण्याचे प्रकार वाढले आहेत. तरी गोपालक शेतकऱ्यांनी बोगस डॉक्टरकडून उपचार करू नये, तसेच पशुवैद्यकीय पदवी नसलेल्या बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)