वाहन उलटले; १५ वऱ्हाडी जखमी
By Admin | Updated: April 26, 2015 00:41 IST2015-04-26T00:41:08+5:302015-04-26T00:41:08+5:30
भंडारबोडी येथून बघेडा येथे वऱ्हाडी घेऊन जाणारे चारचाकी वाहन चिचोली-सौदेपूर फाट्यावर उलटले. यात १५ वऱ्हाडी जखमी झाले.

वाहन उलटले; १५ वऱ्हाडी जखमी
सहा प्रवासी गंभीर : सौदेपूर-चिचोली फाट्यावरील घटना
तुमसर : भंडारबोडी येथून बघेडा येथे वऱ्हाडी घेऊन जाणारे चारचाकी वाहन चिचोली-सौदेपूर फाट्यावर उलटले. यात १५ वऱ्हाडी जखमी झाले. सहा प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे. हा अपघात शुक्रवारी रात्री ८.३० वाजता घडला. जखमींवर तुमसर येथील सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.
मध्य प्रदेशातील भंडारबोडी येथील शिवशंकर भगत यांचेकडील वऱ्हाड बघेडा येथे मुरलीधर बिसने यांचेकडे जात होती. वाहनात १५ वऱ्हाडी बसले होते. वाहन एमएच १८ ई ९४९ चिचोली सौदेपूर फाट्याजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती उलटली.
यात संकेत शरणागत (१३) रा. नवेगाव, बुधराम भगत (५५) भंडारबोडी, मंगरू शरणागत (६०) काचेवानी, चंद्रकांत चौधरी (२८) नवेगाव चालक, चैनलाल कोडवते (२८) भंडारबोडी, प्रेमसागर सोनवने (१५) काचेवानी, आशिष तुरकर (१४) सुकळी नकुल गंभीर जखमी झाले. अन्य प्रवासी किरकोळ जखमी झाले. रात्री ८.३० दरम्यान हा अपघात घडला. जंगलव्याप्त परिसर असल्याने जखमी प्रवाशांची तारांबळ उडाली होती. ग्रामस्थांनी तुमसर येथील सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता प्रवाशांना दाखल केले. बहुतांश प्रवाशांना डोके, हातपायाला जखमा झाल्या.
गोबरवाही पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी या वाहनात बसले होते. आंतरराज्यीय सीमा सताड उघड्या असून लग्नाचा हंगाम सुरू असून अशा वाहनांवर कारवाई करण्याची गरज आहे.
मध्य प्रदेशातून हे वाहन महाराष्ट्रात दाखल झाले. कर्तव्यदक्ष पोलिसांनी या वाहनाची साधी दखल घेतली नाही. तुमसर-वाराशिवनी व तुमसर-कटंगी मार्गावर शेकडो वाहने क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेऊन दररोज धावत आहेत. अशा वाहनांवर पोलिसांनी कारवाई करणे गरजेचे आहे. (तालुका प्रतिनिधी)