स्वयंपाकघरातून भाज्यांची ‘एक्झिट’
By Admin | Updated: July 5, 2014 23:23 IST2014-07-05T23:23:14+5:302014-07-05T23:23:14+5:30
महागाईची झळ सामान्यांना बसत आहे. आजचे दर उद्या नाहीत आणि उद्याचे दर परवा नाहीत, अशी स्थिती निर्माण झाली आहे. यंदा दुष्काळजन्य स्थितीमुळे यात आणखी भर पडली आहे.

स्वयंपाकघरातून भाज्यांची ‘एक्झिट’
कांद्यानेही रडविले : धान्याचे दरही आवाक्याबाहेर, गृहिणींचे बजेट कोलमडले
भंडारा : महागाईची झळ सामान्यांना बसत आहे. आजचे दर उद्या नाहीत आणि उद्याचे दर परवा नाहीत, अशी स्थिती निर्माण झाली आहे. यंदा दुष्काळजन्य स्थितीमुळे यात आणखी भर पडली आहे. भंडारा जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तू आणि धान्य व कडधान्याचे भाव वधारले आहेत. साठेबाजीमुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री बसत आहे. भाज्यांचे दर अव्वाच्या सव्वा वाढल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.
सरकारच्या आकडेवारीत लोकांना स्वारस्य नाही. त्यांना वस्तूंचे दर समजतात व शंभर रुपयात काल ज्या वस्तू येत होत्या, त्या आज येत नाहीत. त्याला आज जास्त पैसे मोजावे लागत आहेत, एवढेच ग्राहकांना समजते. सर्वच जीवनावश्यक वस्तूंच्या भावांचा आलेख चढता आहे व ही महागाई कुठपर्यंत जाईल, या कल्पनेनेच सामान्य माणूस आज धास्तावलेला आहे. धान्य, कडधान्य, खाद्य तेल, भाज्या, दूध, चहा, साखर, गूळ यांचे भाव सतत वाढत आहेत व ते आणखी किती वाढणार आहेत, हे सांगता येणार नाही.
डिझेलच्या वाढीव दरामुळे वाहतुकीचे दर वाढले आहेत. त्यामुळे जनतेला केंद्रातील नवीन सरकारने रडकुंडीस आणले आहे. आता अच्छे दिन केव्हा येणार याची प्रतीक्षा आहे.
(नगर प्रतिनिधी)
केंद्र सरकारने कांद्याचे निर्यात मूल्य वाढविल्याने सर्वच बाजारपेठेतील दर अचानक वाढले आहेत. भंडाऱ्याच्या ठोक बाजारातील भाव प्रति किलो २० रुपयांवर गेले. किरकोळ विक्रीमध्ये लाल कांदा २० रुपये तर पांढरा कांदा २५ रुपये आणि आलू २४ रुपये किलो आहे. लाल कांद्याचा कट्टा ४०० रुपये आणि पांढरा कांद्याचा कट्टा ५०० रुपये आहे. त्यात आणखी भाववाढ होऊ शकते, असे भंडारा भाजी बाजारातील आलू-कांदे व्यावसायिक बबलू पठाण यांनी सांगितले. निर्यात मूल्य वाढताच बाजारात आवक २५ टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. दिवाळीपर्यंत कांदा खाली येण्याची शक्यता नाही. दुष्काळी परिस्थितीमुळे कांद्याची लागवड कमी झाली असून उत्पादन घटण्याची भीती आहे. लांबलेल्या पावसाने कांदा पिकाचे नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सध्या कांदा शेतकरी आणि मोठ्या व्यापाऱ्यांकडे आहे.