पूरग्रस्त 130 गावांचा ‘व्हीडीएम’ आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 05:00 AM2021-06-10T05:00:00+5:302021-06-10T05:00:15+5:30

भंडारा जिल्ह्यात दरवर्षी महापुराचा फटका बसतो. अनेक गावांत पाणी शिरून घरांचे आणि मालमत्तेचे मोठे नुकसान होते. गतवर्षी वैनगंगा नदीला आलेल्या महापुरात प्रचंड नुकसान झाले होते. भंडारा, पवनी, तुमसर, मोहाडी, लाखांदूर हे तालुके पूरबाधित झाले होते. मध्यप्रदेशातील संजय सरोवरमधून पाणी सोडल्याने ही पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. ४४ हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले होते. चार जणांचा महापुरात बळी गेला तर अनेक पशुधनाची जीवितहानी झाली.

VDM plan of 130 flood affected villages | पूरग्रस्त 130 गावांचा ‘व्हीडीएम’ आराखडा

पूरग्रस्त 130 गावांचा ‘व्हीडीएम’ आराखडा

Next
ठळक मुद्देगावात पाच समित्यांची स्थापना : पूरपरिस्थितीशी सामना करण्यास प्रशासन सज्ज

लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : अचानक उद्भवलेल्या पूरपरिस्थितीशी सामना करताना प्रशासनासोबतच गावकऱ्यांनाही मोठे अडचणीचे जाते. गतवर्षीच्या महापुराचा अनुभव पाहता यंदा पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. पुराचा फटका बसणाऱ्या जिल्ह्यातील नदीतिरावरील १३० गावांचा गाव आपत्ती व्यवस्थापन आराखडा (व्हीडीएमपी) तयार करण्यात आला असून सरपंचापासून वायरमनपर्यंत आणि पट्टीच्या पोहणाऱ्यांचा समावेश असणारी समिती स्थापन करण्यात आली आहे. 
भंडारा जिल्ह्यात दरवर्षी महापुराचा फटका बसतो. अनेक गावांत पाणी शिरून घरांचे आणि मालमत्तेचे मोठे नुकसान होते. गतवर्षी वैनगंगा नदीला आलेल्या महापुरात प्रचंड नुकसान झाले होते. भंडारा, पवनी, तुमसर, मोहाडी, लाखांदूर हे तालुके पूरबाधित झाले होते. मध्यप्रदेशातील संजय सरोवरमधून पाणी सोडल्याने ही पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. ४४ हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले होते. चार जणांचा महापुरात बळी गेला तर अनेक पशुधनाची जीवितहानी झाली. जिल्हा प्रशासन, पोलीस, एनडीआरएफच्या दोन आणि एसडीआरएफच्या तीन चमूंना पाचारण करण्यात आले होते. भंडारा शहरही अर्धे जलमय झाले होते. ही परिस्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने यंदा सूक्ष्म नियोजन केले आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या दोन सभा आतापर्यंत घेण्यात आल्या आहेत. त्यानुसारच आता जिल्ह्यातील पूरबाधित गावात गाव आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला आहे. जिल्ह्यात १५४ गावे नदीतिरावर असून दरवर्षी १३० गावांना पुराचा फटका बसतो. या गावांचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला आहे. सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, गावातील नागरिक आदींची समिती तयार करून काम निश्चिती करण्यात आली आहे. प्रत्येक गावात तात्पुरते निवासी शिबिर निश्चित करण्यात आले आहे. वीज, औषधी, पिण्याचे पाणी, निवासी सुविधा आधीच तयार करण्यात येणार आहे तसेच या शिबिरांमध्ये जनरेटरही उपलब्ध राहणार आहे. प्रत्येक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रात अँटीव्हेनम लसी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 
प्रत्येक संभावित पूरबाधित गावांची उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. नागरिकांशी चर्चा करून पूरपरिस्थिती उद्भवल्यास काय उपाययोजना करता येईल याबाबत चर्चा केली तर जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी प्रमुख व मोठ्या प्रमाणात बाधित होणाऱ्या गावांना भेटी देऊन पाहणी केली. गावातील प्रमुख व्यक्तींशी चर्चा केली. कोणत्याही परिस्थितीत पूरपरिस्थिती उद्भवल्यास त्याचा सामना कसा करावा यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.

सरपंच, तलाठी, ग्रामसेवकांच्या अध्यक्षतेत समित्या
- गाव आपत्ती व्यवस्थापन आराखड्यानुसार १३० ही गावात पाच समित्यांची निर्मिती करण्यात आली आहे. सरपंचांच्या अध्यक्षतेत तात्पुरते निवारे समिती, तलाठ्यांच्या अध्यक्षतेत गावस्तरावर संसाधन निर्मिती समिती, सरपंचांच्याच अध्यक्षतेत गाव बचाव समिती, ग्रामसेवक किंवा तलाठी यांच्या अध्यक्षतेत गाव आरोग्य समिती आणि तहसीलदारांच्या अध्यक्षतेत तालुकास्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी या पाच समित्यांच्या माध्यमातून उपाययोजना केल्या जाणार आहेत. 

पूरबाधित गावे
- जिल्ह्यात १५४ गावे नदीतिरावर असून १३० गावांना महापुराचा फटका बसतो. त्यात भंडारा तालुक्यातील २७, मोहाडी १७, तुमसर २४, पवनी ३४, साकोली ३, लाखांदुर १८ आणि लाखनी तालुक्यातील ९ गावांचा समावेश आहे. वैनगंगा नदीतिरावर ९९ गावे असून त्यापैकी ८३ गावांना पुराचा फटका बसतो. चुलबंद नदीच्या तिरावरील ३१ पैकी २१, सुर नदीच्या ११ पैकी ७, कन्हानच्या ४ पैकी ३ आणि बावनथडीच्या नऊही गावांचा पुराचा फटका बसतो.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. १३ मे रोजी पहिली आणि ३ जून रोजी दुसरी सभा घेण्यात आली आहे. जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या मार्गदर्शनात पूरपरिस्थिती हाताळण्याचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. यासोबतच आंतरराज्यीय समन्वय समितीची सभाही घेण्यात आली. जिल्ह्यात सात ठिकाणी माॅकड्रील आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाने अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे.
-अभिषेक नामदास,  
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी.

 

Web Title: VDM plan of 130 flood affected villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.